पुणे : मंगळवार पेठेतील एका ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तडीपार गुन्हेगारासह तिघांस फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. मंगेश ऊर्फ भज्या संजय पवार (वय २२, रा. खडी मशिन चौक, कोंढवा) असे तडीपार गुन्हेगाराचे, तर शुभम महेंद्रा सोनावणे (वय ३०, रा. शिवाजीनगर) आणि कुमार ऊर्फ कुम्या बाळकृष्ण खुडे (वय २३, रा. मनपा कॉलनी, वाकडेवाडी) अशी दोघांची नावे आहेत. याप्रकरणी रोहन ऊर्फ दुध्या चव्हाण आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील नाकोडा ज्वेलर्स लुटण्याच्या तयारीत असताना तिघांना अटक केली. त्यांच्याकडून कोयते, बॅटरी, मिरचीपूड, दोरी आणि एक लोखंडी कटावणी असा ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगेश पवार याला जून २०१७ रोजी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. तर इतर आरोपींवर देखील शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांंनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांची १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.