पुणे : वाघोली परिसरातील वाघेश्वर मंदिरासमोरच्या रस्त्यावर एका कारच्या तपासणीत ४ लाख ३० हजार रुपये किमतीचा २१ किलो गांजा सापडल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अक्षय अंबादास बिडगर (वय २५, रा. खराडी), सोनल किसन काळे (वय १९, रा. जामखेड, नगर), सागर गोपीनाथ पोले (वय १९, रा. कंधार, नांदेड) अशी पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात लोणी कंद पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. १९) पोलिसांनी आरोपींना जेरबंद करत न्यायालयात हजर केले.
गांजा हा व्यावसायिक विक्रीसाठी वापरला जाणार होता. त्यासाठी आरोपींनी आंतरजिल्हा टोळी करून अमली पदार्थांची तस्करी केली आहे का, हा अमली पदार्थ कोठून आणला, मुख्य सूत्रधार कोण आहे, याबाबत तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील मैथिली काळवीट यांनी केली. अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण पुढील तपास करत आहेत.