लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, उमेवारी अर्ज दाखल करण्यास बुधवार (दि. २३) डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. हवेली तालुक्यातील शेवाळवाडी, औताडे-हंडेवाडी आणि वडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीचा पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत तर बारामती तालुक्यातील माळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद करण्याबाबत शासनाने प्राथमिक अद्यादेश काढला असला तरी अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने या पाचही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणारच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
पुणे शहरालगतची २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यासंदर्भात शासन स्तरावर जोरदार हलचाली सुरू होत्या, त्यानुसार बुधवारी अद्यादेश देखील काढले. परंतु या संदर्भात अंतिम आदेश झालेला नाही. या २३ गावांपैकी हवेली तालुक्यातील शेवाळवाडी, औताडे-हंडेवाडी आणि वडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. तसेच बारामती तालुक्यातील माळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद होणार आहे. परंतु, अद्याप या पाचही ग्रामपंचायती संदर्भात शासनाकडून कोणतेही स्पष्ट आदेश आले नाहीत. यामुळे या पाचही ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणुका घेण्यात येणार आहेत.