अध्यक्षपदाचे काय ते तीन पक्षप्रमुख ठरवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:20+5:302021-02-06T04:18:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “कोणीही राजीनामा दिला की त्यावरून सरकार अस्थिर झाल्याच्या वावड्या उठतात. पद रिक्त झाले आहे. ...

The three party leaders will decide on the chairmanship | अध्यक्षपदाचे काय ते तीन पक्षप्रमुख ठरवतील

अध्यक्षपदाचे काय ते तीन पक्षप्रमुख ठरवतील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “कोणीही राजीनामा दिला की त्यावरून सरकार अस्थिर झाल्याच्या वावड्या उठतात. पद रिक्त झाले आहे. त्यावर सरकारमधील तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून काय ते ठरवतील,” असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीच री ओढली.

“अधिवेशन तोंडावर आलेले असताना पटोले यांचा राजीनामा यायला नको होता. अधिवेशन झाल्यावर दिला असता तरी चालले असते असे,” असेही पवार म्हणाले. शुक्रवारी (दि.५) एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते.

मुख्यमंत्री नाराज, उपमुख्यमंत्री नाराज, सरकार अस्थिर या सर्व वावड्या आहेत. त्यात काही तथ्य नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, सरकार स्थापनेच्या वेळीच मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असे ठरले होते, त्यात बदल व्हायचे काही कारण नाही. आघाडीत तीन पक्ष आहेत, त्यांचे प्रमुख एकत्र बसून सगळे ठरवतात, किमान समान कार्यक्रमावर सरकार चालले आहे.

“भारतीय जनता पार्टीकडे आता भांडायला काहीच मुद्दे शिल्लक नाहीत. त्यामुळे वाढीव वीज बिल, इंधनाचे दर असे काहीतरी काढून ते ओरडत असतात. इंधनाचे दर कोणावर अवलंबून आहे ते जनतेला चांगले माहिती आहे. वाढीव वीज बिलांबाबत सरकार तोडगा काढते आहे, त्यामुळे त्यांनी चिंता करायचे कारण नाही,” असे पवार म्हणाले. महापालिका निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये असा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवण्यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

तिथेच खुलासा झाला असता तर...

“एल्गार परिषदेतल्या भाषणात ‘ते’ विधान यायला नको होते. सरकार योग्य कायदेशीर कारवाई करेलच. या देशात, राज्यात सगळे समाज, सगळे धर्म गुण्यागोविंदाने राहातात. कोणीही कोणाचा द्वेष किंवा अवमानास्पद बोलणे करायला नको. न्यायाधीश म्हणून काम केलेली व्यक्ती व्यासपीठावर असताना तरी ते वक्तव्य नको होते, त्यांनी तिथेच त्याचा खुलासा केला असता तर चांगले झाले असते.” - अजित पवार

Web Title: The three party leaders will decide on the chairmanship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.