पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील महत्त्वाच्या समजल्या जाणा-या खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहने तपासताना राजगड पोलिसांनी मोटारीतून बिबट्याच्या बछड्यांची तस्करी करणा-या तिघांना राजगड पोलीसांनी सोमवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून बिबट्याचे दोन बछडे ताब्यात घेण्यात आले आहे. या बछड्यांची तपासणी करून त्यांना कात्रज वनउद्यानात पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना हबिब सय्यद (वय ३१, रा.कवठेयमाई ता.शिरूर जि.पुणे), इराफास मेहबूब शेख (वय ३२ रा.वडगांव बुद्रुक, खडी मशीन शेजारी), आयास बक्षुलखान पठाण (वय ४० रा. घोरपडी पेठ पुणे) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी सकाळी राजगड पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एका मोटार पोलीसांना संशयास्पद आढळली. त्यांनी मोटारीची तपासणी केली असता गाडीच्या मागच्या बाजला दोन खोकी झाकून ठेवल्याचे दिसले. पोलीसांनी त्याची तपासणी केली असता प्राण्यांकरिता वापरण्यात येणा-या प्लास्टिक बकेट मध्ये बिबट्याची दोन बछडे आढळून आली. पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले. तसेच याची माहिती नसरापूर येथील वनविभागाचे अधिकारी एस. यु जाधवर यांना दिली. त्यांनी घटनास्थळी येत यातील एक बछडा नर आणि एक बछडा मादी जातीचा असल्याचे सांगितले. राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अंबादास बुरटे, सचिन कदम आणि मनोज निंबाळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सहायक फौजदार समीर कदम करत आहेत.
खेड शिवापूर टोल नाक्याजवळ बिबट्याच्या पिलांची तस्करी करणारे तिघे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 8:14 PM
खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहनांची तपासणी करत होते. यावेळी एका मोटार पोलिसांना संशयास्पद आढळली...
ठळक मुद्देराजगड पोलिसांची कारवाई , दोन बछड्यांची सुटका