मोटारीच्या धडकेत तिघे गंभीर
By Admin | Published: September 13, 2016 01:21 AM2016-09-13T01:21:02+5:302016-09-13T01:21:02+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावर आज सकाळी १० वाजता गंभीर अपघात घडला. सोलापूर बाजूने पुण्याकडे जाणाऱ्या मोटारीने रस्त्याच्या बाजूला पार्किंग करण्यात आलेल्या प्रवासी वाहनांना धडक दिली.
भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर आज सकाळी १० वाजता गंभीर अपघात घडला. सोलापूर बाजूने पुण्याकडे जाणाऱ्या मोटारीने रस्त्याच्या बाजूला पार्किंग करण्यात आलेल्या प्रवासी वाहनांना धडक दिली. या अपघातात चार-पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात मोटार (एमएच १४-डीएक्स ७९०१) घेऊन चालक दिलीप हरिभाऊ कुरे (रा. वाकड, ता. मुळशी) भरधाव वेगाने निघाला होता. या वेळी मोटारीने महामार्गावर पार्क केलेल्या ३ स्कॉर्पिओ, इर्टिगा, इंडिगो या गाड्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये या गाड्यांचे १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
पंढरपूरवरून इंडिका मोटार निघाली होती. अपघातप्रकरणी चालक कुरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर कुरे फरारी झाला आहे. या अपघातात इंडिकामधील गणपत सोपान देवकर, अर्जुन शिवराज भुजबळ, हनुमंत नातू भुजबळ (तिघे रा. पिंपरी चिंचवड) हे जखमी झाले आहेत. अपघातात नुकसान झालेल्या वाहनांवर महामार्गावर पार्किंग केल्या प्रकरणी भिगवण पोलीस गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्ग असला तरी याचे भान येथील नागरिकांना तसेच हायवे प्रशासन आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांना नसल्याचे चित्र आहे. या मुख्य रस्त्यावरच गाड्यांचे पार्किंग आणि व्यवसाय थाटले जातात. सोलापूर बाजूने पुण्याच्या बाजूने जाणाऱ्या वेगवान मोटारीच्या चालकाचे गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या चार-पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत चार-पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सकाळची वेळ असल्यामुळे या ठिकाणी गर्दी कमी होती. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. हा अपघात रस्त्यावर गाड्या पार्क करणाऱ्या आणि रोडवर बसून भाजीपाला आणि फळे विकणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. चार रुपये कमाविण्याच्या हिशेबाने रस्त्यावरच संसार थाटणार आणि आपल्यासोबतच निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात घालत आहेत.