चेन्नईतील ३ विद्यार्थी पुण्यातील धरणात बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:34 AM2018-04-27T01:34:22+5:302018-04-27T01:34:22+5:30
उन्हाळी शिबिर बेतले जिवावर : निष्काळजी आयोजक, शिक्षकांवर गुन्हा दाखल
पौड (जि. पुणे) : कातरखडक (ता. मुळशी) येथे चेन्नईहून उन्हाळी शिबिरासाठी आलेले तीन विद्यार्थी धरणात बुडाल्याची घटना बुधवारी घडली. २० तासांच्या शोधमोहिमेनंतर गुरुवारी दुपारी तिघांचेही मृतदेह सापडले असून ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. डॅनिश राजा (वय १३), संतोष के. (वय १३), सर्वान्ना (वय १३) अशी मृतांची नावे आहेत.
आयोजक, शाळा आणि शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याची तक्रार मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईक आणि स्थानिक पोलीस पाटील यांनी केली. त्यावरून विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शिबिराचे आयोजक ‘टीच फॉर इंडिया’ ही संस्था, चेन्नईतील एसीएस मॅट्रिक्युलेशन शाळेचे शिक्षक, ‘जॅकलीन स्कूल आॅफ थॉट’चे स्थानिक संचालक आणि प्रशिक्षक अशा चौघांविरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
येथील जॅकलीन स्कूल आॅफ थॉट या संस्थेमध्ये ‘टीच फॉर इंडिया’ या संस्थेच्या माध्यमाने आयोजित उन्हाळी शिबिरासाठी चेन्नई येथील एसीएस मॅट्रिक्युलेशन शाळेची १३ ते १५ वयोगटातील २० मुले मंगळवारी (दि. २४) मध्यरात्री आली होती. हे शिबिर ८ दिवस येथे घेण्यात येणार होते. यामध्ये १२ मुले व ८ मुली होत्या. त्यांच्यासोबत एक शिक्षक तर तीन शिक्षिका होत्या. या मुलांच्या निवास व भोजनाची व्यवस्था कातरखडकचे उपसरपंच शंकर दशरथ चव्हाण यांच्याकडे केली होती.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास अरुण नावाच्या शिक्षकासमवेत काही मुले पाण्यात उतरली. यापैकी कुणालाच पोहता येत नव्हते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने डॅनिश राजा, संतोष के. सर्वान्ना बुडाले. मुले व शिक्षकांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना बोलावले. त्यात डॅनिश राजा याचा ताबडतोब शोध लागला. परंतु वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्णालयात घेऊन जाताना त्याचा मृत्यू झाला. काही वेळाने मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन टीम दाखल झाली; परंतु, खोल पाणी व अंधार पडल्याने मृतदेह सापडले नाही. गुरुवारी दुपारी उर्वरित दोन्ही मृतदेह सापडले.
शिक्षकाला पोहता येत नसतानाही मुलांना पाण्यात का उतरू दिले?
या घटनेने उन्हाळी शिबिरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिक्षकांना पोहता येत नसताना व धरणाच्या पाण्याचा अंदाज नसताना त्यांनी मुलांना पाण्यात का उतरू दिले, असा प्रश्न मृतांच्या नातेवाइकांनी केला.