तीन अट्टल चोरांना १२ तासांत पकडले. पुरंदरमध्ये तीन ठिकाणी दागिनेचोरीचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:20 AM2017-08-11T02:20:02+5:302017-08-11T02:20:02+5:30
जेजुरी पारगाव मेमाणे व सासवड येथील तीन घटनांत बुधवारी (दि. ९) महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या तिघा अट्टल चोरट्यांना जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे तसेच पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी १२ तासांत शिताफीने पकडले.
जेजुरी : जेजुरी पारगाव मेमाणे व सासवड येथील तीन घटनांत बुधवारी (दि. ९) महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या तिघा अट्टल चोरट्यांना जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे तसेच पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी १२ तासांत शिताफीने पकडले. संदीप पांडुरंग मेमाणे (वय २३, रा. पारगाव मेमाणे, ता. पुरंदर), अक्षय अशोक शेंडकर (वय २१) व चेतन अमर शेंडकर (वय १९, दोघे रा. पिंपरी, ता.पुरंदर) अशी चोरट्यांची नावे आहेत.
जेजुरी पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी : बुधवारी (दि.९) आशा नागदेव माने (वय ३५, रा. वाठार स्टेशन, ता.कोरेगाव, जि.सातारा) या त्यांचे पती, मुले, बहीण आदी नातेवाईक पुरंदर तालुक्यातील दिवे येथे आईला भेटण्यासाठी आले होते. आईला भेटल्यानंतर हे कुटुंब जेजुरीला देवदर्शनासाठी चारचाकी गाडीतून आले. जेजुरीच्या मुख्य रस्त्यावरील पार्किंगमध्ये गाडी लावल्यानंतर आशा माने व त्यांचे कुटुंबीय रस्त्याने चालत गडाकडे निघाले असता, सायंकाळी पाचच्या सुमारास एका पल्सर गाडीवरून तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन तरुणांपैकी गाडीवर मागे बसलेल्या तरुणाने भर गर्दीत आशा माने यांच्या गळ्यात हात घालून गळ्यातील दागिने हिसकाविले. हा प्रकार लक्षात येताच आशा माने यांनी गळ्यातील दागिने हातांनी पकडले. मात्र, मोठे मंगळसूत्र, लहान मंगळसूत्र व राणीहाराचा निम्मा भागच त्यांच्या हातात आला व उर्वरित सोन्याचे दागिने घेऊन हे चोरटे भरधाव पळून गेले. या घटनेत दोन्ही मंगळसूत्रे व राणीहार असे सुमारे ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले.
वृत्त समजताच जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी चोरट्यांची माहिती पोलिसांना देऊन परिसरात नाकेबंदी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये दोन पल्सर वाहनांवरील तीन चोरट्यांचे फोटो घेऊन त्यांनी पोलीस व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविले. या चोरट्यांपैकी एकाची माहिती जेजुरी पोलिसांना खबºयाकडून मिळाली. या चोरट्याला दोन तासांत जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे दोघे चोरटे सासवड रस्त्याकडे गेले. पुढे सासवड सोनोरी रस्त्यावर रात्री ९च्या सुमारास सुनीता दशरथ साळुंखे (वय ३८, रा. सासवड-सोनोरी रस्ता) या भाजी विकून घरी जात असताना त्यांनी त्यांना ‘मावशी थांबा, तुमच्याकडे काम आहे,’ असे सांगितले. सुनीता साळुंखे थांबल्या असता या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ९ ग्रॅम वजनाचे २३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले हिसकावून पोबारा केला. त्यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, राजेश मालेगावे, अमृता काटे, शिवा खोकले, सचिन पड्याळ रणजित निगडे, हनुमंत गार्डी, दादा भुजबळ, कुलदीप फलफले, दीपक आवळे, संदीप कारंडे, अक्षय यादव, शैलेश स्वामी, सागर शिंगाडे, किसन कानतोडे, संदीप पवार, संजय पलंगे, संतोष कुदळे यांचे पथक तयार करण्यात आले होते.
जेजुरी येथील चोरीची घटना घडल्यानंतर हे अज्ञात चोरटे पारगाव मेमाणे येथे गेले. पारगाव मेमाणे-सासवड रस्त्यावर रात्री सव्वाआठच्या सुमारास प्रणाली प्रशांत धुरी (वय ३०, रा. पारगाव मेमाणे या त्यांचे चहाचे दुकान बंद करीत असताना दोघे चोरटे तेथे आले. त्यांनी दुकानातून सिगारेट घेतली. यातील एका चोरट्याने प्रणाली धुरी यांना मागून पकडले, तर दुसºयाने त्यांच्या गळ्यातील एक सोन्याचे गंठण व अर्धा तोळ्याचे सोन्याचे लॉकेट हिसकावून घेतले. या वेळी प्रणाली धुरी यांनी आरडओरडा केला. या वेळी शेजारी राहणारे लोक धावत आले. मात्र, दोघे चोरटे गाडी घेऊन पसार झाले. या घटनेत प्रणाली धुरी यांचे ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले.