पुणे : ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा जाब ब्रिटिशांना विचारणारे भारतीय असंतोषाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दीवर्षाची सांगता येत्या १ ऑगस्टला होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि. ३१ जुलै) ज्येष्ठ नाटककार विश्राम बेडेकर लिखित ‘टिळक आणि आगरकर’ ही अजरामर नाट्यकृती दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजता आणि रात्री साडेदहा वाजता तसेच रविवारी पहाटे दीड वाजता हे नाटक प्रक्षेपित होणार आहे.
शासनाने १ ऑगस्ट २०२० ते २०२१ हे वर्ष लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दी वर्ष म्हणून जाहीर केले आहे. दूरदर्शन नाटकाच्या प्रक्षेपणातून टिळकांना मानवंदना देणार आहे. मराठी रंगभूमीवरील सुवर्णपान ठरलेले ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकात ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, सुनील जोशी, आकाश भडसावळे, संध्या म्हात्रे, गायत्री दीक्षित, अथर्व गोखले, अनुष्का मोडक, जगदीश जोग या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. निर्माते आकाश भडसावळे व सुनील जोशी यांनी २०१७ साली ३५ वर्षांनंतर हे नाटक पुनरुज्जीवित केले आहे. या नाटकासोबतच लोकमान्यांच्या घराण्यातील त्यांचे पणतू डॉ. दीपक जयंतराव टिळक यांची मुलाखतही येत्या बुधवारी (दि. २८ जुलै) आणि रविवार (१ ऑगस्ट) या दोन्ही दिवशी प्रसारित होणार आहे.