तिशीपार महिलांचा सौंदर्याचा फॉर्म्युला, ‘नॉन सर्जिकल’ उपचारात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:27 AM2020-12-16T04:27:45+5:302020-12-16T04:27:45+5:30

पुणे : अभिनेत्री किंवा मॉडेल सुंदर दिसण्यासाठी ‘कॉस्मेटिक सर्जरी’ करून घेत असल्याचे आपण अनेकदा ऐकले किंवा पाहिले आहे. पण ...

Tisipar Women's Beauty Formula, Increase in 'Non Surgical' Treatment | तिशीपार महिलांचा सौंदर्याचा फॉर्म्युला, ‘नॉन सर्जिकल’ उपचारात वाढ

तिशीपार महिलांचा सौंदर्याचा फॉर्म्युला, ‘नॉन सर्जिकल’ उपचारात वाढ

googlenewsNext

पुणे : अभिनेत्री किंवा मॉडेल सुंदर दिसण्यासाठी ‘कॉस्मेटिक सर्जरी’ करून घेत असल्याचे आपण अनेकदा ऐकले किंवा पाहिले आहे. पण तिशीच्या आतबाहेरील मध्यमवर्गीय महिलांमध्येही या उपचारांची आवड वाढल्याचे दिसत आहे. त्यातही ‘कॉस्मेटिक सर्जरी’पेक्षा कमी खर्चात, रसायने व कृत्रिम औषधेविरहित ’नॉन सर्जिकल उपचारपद्धती’कडे महिलांचा कल अधिक असल्याचे समोर आले आहे.

चिरतरूण दिसावं अशी इच्छा अनेक महिलांना असते. परंतु जसे वय वाढत जाते तसं चेहऱ्याच्या त्वचेत आपोआपच बदल होत जातात. या स्त्रियांना ‘नॉन सर्जिकल’ उपचारपद्धती आशेचा किरण ठरली आहे.

‘नॉन सर्जिकल उपचारपद्धती’ विषयी कॉस्मटिक डेंटल सर्जन डॉ. शैलेंद्र वर्दे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, सौंदर्य अबाधित राखण्यासाठी प्लास्टिक सर्जरी, फॅट ट्रान्सफर, लायपोसक्शन, इम्प्लांट अशा विविध उपचारपद्धती उपलब्ध आहेत. मात्र हे उपचार खूप खर्चिक आहेत. त्या तुलनेत नॉन सर्जिकल उपचारपद्धती ही कमी खर्चिक आणि केमिकलविरहित आहे. यात आपल्याच रक्तातील घटकांचा वापर करून हे उपचार केले जातात. या उपचारांचा मोठा फायदा ‘अँटी एजिंग’ साठी होतो.

या उपचारपद्धतीमध्ये फेस लिफ्टिंग, नाक, ओठांचा आकार, डोळ्यांखालील काळी वर्तुळे, नाकाशेजारी पडणाऱ्या घड्या यावर उपचार केले जातात. स्तनांचा आकार बदलला जातो. ‘नॉन सर्जिकल’ उपचारपद्धतीला प्राधान्य देणाऱ्या तिशीपुढील महिला हाच सध्याचा ‘कॉस्मेटिक ट्रेंंड’ आहे.

साधारणपणे 50 ते 70 वर्षांच्या महिलांमध्ये ‘फेसलिफ्टिंग’ करून घेण्याचे प्रमाण अधिक आहे. यात चेहऱ्याच्या विशिष्ट भागात एक इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर वर्षातून तीन वेळा आणि वर्षातून एकदा पुन्हा इंजेक्शन घ्यावे लागते, असेही ते म्हणाले.

चौकट

“आज मी पन्नाशी ओलांडली पण चिरतरूण दिसावे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे मी देखील ‘फेस लिफ्टिंग’ करून घेतलं. आज उपचार घेऊन दोन वर्षे झाली. अजूनतरी कोणताही दुष्परिणाम जाणवलेला नाही.

- भारती फडणीस, ज्येष्ठ महिला (नाव बदललेले आहे.)

----------------------------------------------

Web Title: Tisipar Women's Beauty Formula, Increase in 'Non Surgical' Treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.