पुणे : केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त निषेधाचे तसेच समर्थनाचेही बरेच कार्यक्रम बुधवारी शहरात होत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे, तर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने काळ्या पैशांच्या विरोधात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. काही स्वयंसेवी संस्था, संघटना तसेच व्यापारी संघटनाही बुधवारी आंदोलन करणार आहेत. व्याख्यानांना तर मंगळवारपासूनच सुरुवात झाली असून, बुधवारीही काही संघटनांनी व्याख्यानांचे आयोजन केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा सकाळी साडेदहा वाजता लोकमान्य टिळक पुतळा, मंडईपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे. त्यात पक्षाचे नेते अजित पवार तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी ही माहिती दिली. नागरिकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. नोटाबंदीचा फटका बसलेल्या सर्वांनीच मोर्चात सहभागी व्हावे, असे चव्हाण यांनी सांगितले.काँग्रेसच्या वतीने नोटाबंदीचा निषेध म्हणून मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी साडेदहाला स. प. महाविद्यालयापासून मोर्चा सुरू होईल व अभिनव कॉलेज चौकात वसंतदादा पुतळ्यासमोर येईल. तिथे दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पक्षाचे सर्व स्थानिक नेते, आजी-माजी आमदार यात सहभागी होणार आहेत. शहराध्यक्ष रमेश बागवे, सरचिटणीस रमेश अय्यर यांनी ही माहिती दिली.नोटाबंदी निषेध, पुणे अशा नावाने सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी व असीम सरोदे यांनी एस. एम. जोशी सभागृहात मंगळवारी व्याख्यानाचे आयोजन केले होेते. बुधवारीही काही संघटनांनी लहान-मोठे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
नोटाबंदी निर्णयाचा आज धुरळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 8:18 AM