कारवाई केलेली वाहने पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:46 PM2018-03-20T12:46:54+5:302018-03-20T12:46:54+5:30
पोलीस प्रशासनाच्याच आवारातून पळवून नेण्याचा प्रकार वाढल्याने या तस्करांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गाडी पळवताना महसूल व पोलीस प्रशासनावर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे सात ते आठ माणसे उभी
टाकळी हाजी : शिरूर तालुक्यात वाळूतस्करांची गुंडगिरी वाढत चालली आहे. महसूल विभागाने पकडून आणलेले वाळूचे ट्रक, महसूल, पोलीस प्रशासनाच्याच आवारातून पळवून नेण्याचा प्रकार वाढल्याने या तस्करांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. वाळू वाहतुकीच्या विरोधात उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या आदेशानुसार, तहसीलदार रणजित भोसले यांनी अनेक वाळूच्या ट्रक, तसेच उपसा करणाऱ्या जेसीबी मशीन यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, तरीसुद्धा तस्करांवर वचक बसलेला नाही. शिरूर पंचक्रोशी, तसेच बेट भाग, पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. गेल्या आठवड्यात शिरूर शहरात महसूल प्रशासनाने पकडलेली वाळूची सचिन घावटे यांचा (एमएच १२ एफझेड ९८७७) हा ट्रक महसूल पथकाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात होता. तेथून शनिवारी रात्री ट्रकमालकाने ट्रक पळवून नेला असून, तो अद्यापही फरार आहे. या अगोदर तळेगाव ढमढेरे येथून एका नेत्याच्या पुतण्याने गोडाऊनमध्ये कारवाई करीत पकडलेला ट्रक पळवून नेल्याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली होती; मात्र सत्ताधारी नेत्यांच्या दबावामुळे कारवाई न झाल्यामुळे, अवैध वाळू वाहतूकदारांची मुजोरी वाढली. त्यानंतर अशाच प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत. शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारातून तस्करांनी शनिवारी भरदुपारी गाडी पळवून नेली. गाडीची हवा सोडलेली असताना ती मशीनच्या साह्याने भरून ही गाडी पळविण्यात आली.यापूर्वीही पोलीस ठाण्याच्या आवारामधून गाड्या पळविल्या गेल्या आहेत. ही गाडी पळवताना महसूल व पोलीस प्रशासनावर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे सात ते आठ माणसे उभी करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे हा पोलीस ठाण्यावरच दरोडा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.