पुणे : मागील सहा महिन्यांपासून जवळपास ठप्प असलेल्या पर्यटनाकडे आता लोकांची पावले वळू लागल्याचे चित्र आहे. देशभरातच कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असल्याचे चित्र असल्याने नागरिकांकडून ट्रॅव्हल कंपन्या व एजंटकडे विविध पर्यटनस्थळांची विचारणा सुरू झाली असून काहींनी बुकिंगही केले आहे. प्रामुख्याने दिवाळीच्या सुट्टीत हमखास पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांचा यामध्ये समावेश आहे.
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर दिवाळीचे वेध लागले की पर्यटकांना पर्यटनस्थळे खुणावू लागतात. काही महिने आधीपासूनच त्यासाठी बुकिंग सुरू होते. पण यंदा कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय मागील सहा महिने जवळपास ठप्प होता. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध राज्यांमध्ये अनेक निर्बंध टाकण्यात आले होते. पण मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा कमी होऊ लागल्याने निर्बंध कमी होऊ लागले आहेत. परिणामी, पर्यटनालाही चालना मिळू लागल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये अजूनही पर्यटनाला बंधने आहेत. त्यामुळे अन्य राज्यांमध्ये जाण्यास पर्यटकांकडून ट्रॅव्हल कंपन्याकंडे विचारणा होऊ लागली आहे. कंपन्यांकडूनही पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कीट दिली जात असून हॉटेल, वाहनांच्या सॅनिटायझेशनचा विचारही केला जात आहे.ट्रॅव्हल एजंट असोसिएशन आॅफ पुणेचे संचालक निलेश भन्साळी म्हणाले, लोकांमधील कोरोनाची थोडी भिती कमी होऊ लागली आहे. घरातून बाहेर पडण्यासाठी लोकांकडून पर्यटनाला पसंती दिली जाईल. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील पर्यटनासाठी विचारणा होऊ लागली आहे. पुढील दोन-तीन महिन्यांच्या बुकींगसाठी पर्यटक उत्सुक दिसत आहे. देशाबाहेर मालदीव व दुबईसह देशात केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यांना पसंती मिळत आहे. महाराष्ट्र व पुण्यामध्येही काही ठिकाणी पर्यटकांकडून विचारणा होत आहे.------------------दिवाळीच्या सुट्यांमध्ये दरवर्षी पर्यटन करणारे आता बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. भिती कमी होत आहे. राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल, अंदमान, गोवा, केरळ, कर्नाटक याठिकाणच्या बुकींग झाल्या असून अनेकांकडून विचारणा होत आहेत. सध्या पर्याय कमी असल्याने भारतातील निसर्ग, ऐतिहासिक ठिकाणांना पसंती आहे. सध्या मागील वर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांपर्यंत बुकींग होत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेवरही भर दिला जात आहे.- विनायक वाकचौरे, गिरीकंद ट्रॅव्हल्स----------------पर्यटक बाहेर पडू लागले आहेत. विकेंडसाठी हॉटेल फुल्ल होत आहेत. लोणावळा, महाबळेश्वर, दापोली, गोवा आदी ठिकाणांना अधिक पसंती मिळत आहे. पण सध्या ग्रुप बुकिंगला मर्यादा आहेत. वैयक्तिक किंवा कुटूंबांकडून विचारणा होत आहेत. हळूहळू बुकिंगही वाढत जातील.- मिलिंद बाबर, मँगो ट्रॅव्हल्स-----------