पुणे : बनावट आधार कार्डच्या साहाय्याने ७१ सीम कार्डची विक्री करणाऱ्याविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश (रा. हडपसर) असे या विक्रेत्याचे नाव आहे. राकेशने खराडी येथील ए. एम. एंटरप्रायजेस येथे १ फेब्रुवारी २०२० ते ३१ मार्च २०२० या कालावधीत हा प्रकार घडला. हा गुन्हा नव्या सॉफ्टवेअरमुळे उघडकीस आला आहे. यामुळे आता बनावट आधार कार्डचा वापर करत गैरप्रकार करणाऱ्यांना आळा बसणार आहे.
केंद्र सरकारने बनावट कागदपत्रांचा वापर करत गैरप्रकार करणाऱ्यांसाठी नवे सॉफ्टवेअर बनवले आहे. त्यात एकच फोटो दुसऱ्याच्या नावाने दिसला तर तो लगेच ट्रेस होतो. याच सॉफ्टवेअरच्या सहाय्याने शहरातील सीम कार्डचा हा स्कॅम समोर आला आहे. शहरातील बनावट कागदपत्रांच्या आधारे सीम कार्ड विक्री प्रकरणात हा पहिलाच गुन्हा असून, येत्या काळात असे अनेक प्रकार समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ७१ सीम कार्ड संदर्भात केंद्र सरकारने संबंधीत सीम कार्ड कंपनीला कळवल्याने राकेश नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट आधार कार्डद्वारे जे फ्रॉड केले जात आहेत, ते थांबवण्यासाठी हा उपाय असल्याचे सांगितले जात आहे.
याप्रकरणी एका सीम कार्ड विक्री करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. चेतन विजय देशमुख (४४, रा. वाघोली) असे फिर्यादीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, राकेशने संबंधित कंपनीचे सीम कार्ड विकण्यासाठी म्हणून घेतले होते. मात्र, त्याने बनावट आधार कार्डद्वारे ते नेमके कुणाला विकले याचा शोध कंपनीला लागत नसल्याने याप्रकरणी तक्रार करण्यात आली. राकेशने ७१ सीम कार्ड विकल्याचे देखील तपासात समोर आले असून, पोलिस उपनिरीक्षक रवले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.