वाहतूक उपायुक्त पुण्यासाठी तयार करणार स्वतंत्र ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 01:11 PM2019-03-11T13:11:14+5:302019-03-11T13:19:14+5:30
शहराचे नवीन वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी शहरातील वाहतूकीची परिस्थितीचा आढावा घेऊन एक स्वतंत्र ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
पुणे : पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील हाेत चालली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील रस्ते अरुंद पडत आहेत. त्यातच शहरात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने नागरिक खासगी वाहनांचा वापर करतात. त्यामुळे शहराचे नवीन वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी शहरातील वाहतूकीची परिस्थितीचा आढावा घेऊन एक स्वतंत्र ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यासाठी शहरातील सर्व वाहतूक विभागांना सूचित करण्यात आले असून आठवडाभरात हद्दीतील वाहतूक व्यवस्थेबाबत माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे.
वाहनांची वाढलेली संख्या, अपुरे पडणारे रस्ते, त्याचबराेबर बेशिस्त वाहनचालक यामुळे शहरातील वाहतूक काेंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालणेही कठीण झाले आहे. अशातच वाहतूक समस्यांवर एक दिर्घकाळ चालणारा उपाय शाेधून काढणे गरजेचे आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक उपायुक्तांची एक ते दीड वर्षांमध्ये बदली करण्यात आली आहे. पुण्याच्या आधीच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची तर केवळ सहा महिन्यात बदली करण्यात आली. साताऱ्यावरुन पुण्यात बदली हाेऊन आलेले नवनियुक्त वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी स्वतंत्र ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्याचे ठरवले आहे. देशमुख यांनी शहरातील सर्व परिसराची माहिती मागवली आहे. या माहितीच्या आधारे कुठल्या परिसरात काय उपाययोजना करणे गरजेचे आहे? हे ठरवण्यात येणार आहे. रस्ते, पुटपाथ तसेच एमएसईबीचे खांब आदींबाबत उपाययोजनेसाठी महापालिका, एमएसईबी यांच्याशी संयुक्तरित्या काम केले जाणार आहे. पुढील आठ दिवसांत सर्व वाहतूक विभागातून ही माहिती येणे अपेक्षित असून यानंतर प्रत्यक्ष उपाययोजना करण्यात येणार आहेत.
शहरातील ही माहिती घेणार
- रस्ते, अतिक्रमण, पदपथांची अवस्था
- प्रत्येक ठिकाणचे सिग्नल पाहणी
- यु टर्न, वन वे, क्रॉस लाईन आदी
- ठिकठिकाणी पीक अव्हर्स आणि इतर वेळेमधील वाहतूक परिस्थिीती
वाहतूकीबाबत शहरातील विविध भागाच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यात येत आहे. यासाठी सर्व वाहतूक विभागांना सूचना देण्यात आल्या असून आठवडाभरात माहिती जमा केली जाईल. यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येतील.
- पंकज देशमुख, वाहतूक उपायुक्त, पुणे