दाेन महिलांच्या भांडणामुळे वारज्यात वाहतूक काेंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 08:34 PM2018-10-07T20:34:00+5:302018-10-07T20:53:38+5:30
वाहने समाेरासमाेर अाल्याने झालेल्या वादावादीचे रुपांतर भांडणात झाल्याने वारज्यातील अांबेडकर चाैकात तासभर वाहतूक काेंडी झाली हाेती.
पुणे : कार अाणि दुचाकी समाेरासमाेर येऊन झालेल्या वादाचे रुपांतर भांडणात व पुढे एकमेकांवर हात उगारण्याच झाल्याने वारज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक सुमारे तास भर वाहतूक काेंडी झाली होती. दाेन महिलांच्या भांडणात वाहनचालकांना अडकून पडावे लागले. विशेष म्हणजे या भांडणातील एक महिला ही मुंबई पोलिस दलातील महिला कर्मचारी होती.
याबाबत प्रत्यक्षदर्शी व वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारज्यातील अांबेडकर चाैकातून एक जाेडपे कालवा रस्त्याने काेथरुडकडे जात हाेते. तर दुचाकीवरुन एक जाेडपे काेथरुडवरुन चर्चाच्या दिशेला जाण्यासाठी कालवा रस्ताकडे वळत हाेते. यावेळी दाेन्ही वाहने एकमेकांच्या समाेर अाली. त्यावर दुचाकीवरील महिलेने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावर कारमधील महिलेने सुद्धा वाद घातला. त्याचबराेबर दाेन्ही बाजूंनी अर्वाच्च शिवीगाळ सुद्धा करण्यात अाली. चाैकातच हा प्रसंग घडल्याने बघ्यांची माेठी गर्दी झाली हाेती. तसेच माेठी वाहतूक काेंडी सुद्धा झाली. काही वेळाने गस्तीवर असलेले पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी भांडण साेडविण्याचा प्रयत्न केला परंतु यातील एका महिलेने वाहतूक पाेलिसांबराेबरच गस्तीवरच्या पाेलिसांना दाद दिली नाही. दरम्यान या सगळ्यात रस्त्याच्या दाेन्ही बाजूंनी एक किलाेमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. शेवटी कसेबसे समजावत व चौकात अजून पोलिसांची कुमक आल्यावर वाहने पुढे नेण्यात आली व तेथून सर्वांना वारजे पोलिस चौकीत पाठवण्यात आले.
पोलिस चौकीतही प्रचंड वादावादी झाली. पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार घेण्यास सहमती दाखवली. पण वाद विकोपाला जात असल्याची पाहून शेवटी तेथील अधिकारी यांनी कलाम ३५४ (सरकारी कामात अडथळा) प्रकरण दाखल करायला घेतल्यावर हे प्रकरण आपसात सामंजस्याने मिटवण्यात आले. शेवटी सुमारे तीन तास चाललेल्या नाट्यावर अखेर पडदा पडला. पण या प्रकरणाची चर्चा दिवसभर वारजे परीसरात रंगली होती.