पुणे : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली अाहे. शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले अाहेत. त्यातच सातत्याने वाढणारी वाहनांची संख्या अाणि खरेदी निमित्त बाहेर पडलेले नागरिक यांमुळे सर्वत्र ट्रॅफिक जॅम हाेत असल्याचे चित्र अाहे. शहरातील मुख्य पेठांबराेबरच उपनगरांमध्ये सारखेच चित्र पाहायला मिळत अाहे.
अानंद, उत्साह, चैतन्य घेऊन येणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीत माेठ्याप्रमाणावर खरेदी केली जाते. कपड्यांपासून ते साेन्यापर्यंत अशा अनेक गाेष्टी नागरिक खरेदी करत असतात. पुण्यातील बाजारपेठा या प्रसिद्ध असल्याने शहरातील नागरिकांबराेबरच जिल्हातील तसेच राज्यातील विविध भागांमधून नागरिक पुण्यात खरेदीसाठी येत अाहेत. परिणामी शहरातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, शिवाजी रस्ता, तुळशीबाग ही ठिकाणं गर्दीने फुलून गेली असून या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये माेठी वाढ झाली अाहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिक खासगी वाहनांचा वापर करत अाहेत. यात दुचाकींची संख्या सर्वाधिक असली तरी अाता चारचाकींचे प्रमाणही कमालीचे वाढले अाहे.
लक्ष्मी व कुमठेकर रस्त्यांना जाेडणाऱ्या मधील रस्त्यांवर नागरिक कशाही पद्धताने वाहने लावत असल्याचे चित्र अाहे. ज्या ठिकाणी नाे पार्किंग अाहे तसेच वाहन थांबवायला सुद्धा बंदी अाहे त्या ठिकाणी सुद्धा राजराेसपणे वाहने लावली जात अाहेत. वाहतूक पाेलिसांकडून कारवाई हाेत असली तरी त्यांचे मनुष्यबळ अपुरे पडत अाहे. या ठिकाणी असलेली वाहनतळे सुद्धा फुल्ल झाली असल्याने नागरिकांकडून वाट्टेल तिथे गाड्या लावल्या जात अाहेत. सकाळपासून रात्री पर्यंत असेच चित्र असल्याने या ठिकाणी राहत असलेले नागरिक त्रस्त झाले अाहेत.