विभागप्रमुखांकडून कागदोपत्री बदल्या
By admin | Published: December 30, 2014 12:08 AM2014-12-30T00:08:48+5:302014-12-30T00:08:48+5:30
विभागात ठाण मांडून बसल्याचा विषय ऐरणीवर आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी कागदोपत्री केलेल्या बदल्या प्रत्यक्षात आणण्याचे आदेश दिले होते.
पुणे : महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचा विषय ऐरणीवर आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी कागदोपत्री केलेल्या बदल्या प्रत्यक्षात आणण्याचे आदेश दिले होते. बहुतांश विभागप्रमुखांनी या आदेशास केराची टोपली दाखविली असून, एकानेही त्याची अंमलबजावणी केल्याचा अहवाल दिलेला नाही.
पुणे मनपाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्यासंदर्भातील धोरण सर्वसाधारण सभेने काही वर्षांपूर्वी निश्चित केले आहे. मात्र, प्रत्यक्षात या धोरणाची अंमलबजावणीच होत नसल्याचे चित्र आहे. अनेक विभागांतील अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्याने त्यांचे हितसंबंध तयार झाले आहेत. यातून मिळणारा ‘मलिदा’ लाटण्यासाठी त्यांच्याकडून बदल्यांचे आदेश प्रत्यक्षात आणले जात नाहीत. प्रशासनाने बदली केली, तरी ती कागदोपत्रीच राहते, प्रत्यक्षात ते जुन्या खात्यातच काम करीत राहतात. एखाद्या अधिकारी व कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतर त्याला लगेच विभागप्रमुखांनी कार्यमुक्त करणे आवश्यक आहे. काम एकीकडे आणि पगार दुसऱ्या खात्यातून असे अनेक प्रकार महापालिकेमध्ये सुरू आहेत. प्रसारमाध्यमातून यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी १२ डिसेंबर २०१४ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. एकाही विभागप्रमुखांनी तो अहवाल सादर केलेला नाही. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनासही
बाब आणून दिली.
बांधकाम विभागात
सर्वाधिक गोंधळ
४पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या विभागात झाल्यानंतर ते तिकडे रूजच होत नाहीत. दुसरीकडे बदली झाल्यानंतरही बांधकाम विभागातच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.पालिकेतील किमान ५० अधिकारी बदल्या होऊनही दुसऱ्या विभागात रूजू झालेले नाहीत.
४सर्वसाधारण सभेची, अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करणारे अधिकारी, विभागप्रमुखांवर कारवाई करण्याची मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.