पंढरपूर वारी २०१९ : पंढरीच्या वाटेवर चालताना मिळतो सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 01:38 PM2019-07-07T13:38:37+5:302019-07-07T13:47:39+5:30
गावात मिळणारी अपमानास्पद वागणूक, कुटुंबाने बाहेर काढले, समाजाने नाकारले, नशिबी केवळ उपेक्षाच. मात्र पंढरीच्या वाटेवर चालताना वारकरी चांगली वागणूक देतात हिच विठ्ठलाची कृपा
अमोल अवचिते
माळशिरस : गावात मिळणारी अपमानास्पद वागणूक, कुटुंबाने बाहेर काढले, समाजाने नाकारले, नशिबी केवळ उपेक्षाच. मात्र पंढरीच्या वाटेवर चालताना वारकरी चांगली वागणूक देतात हिच विठ्ठलाची कृपा, हे बोल आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाळखी सोहळ्यात यवतमाळहून आलेले तृतीयपंथी वारकरी शिवाजी संजय तिडके यांचे. घरची वारकरी परंपरा असून ती सुरू ठेवण्यासाठी ते वारी करत आहेत.
टाळी वाजवून पैशांची मागणी करून कसाबसा उदरनिर्वाह केला जातो. मात्र फक्त पैसा हेच सर्वस्व नसतो. तृतीयपंथी यांना देखील देव असतो. आणि तो आमचा देव म्हणजे विठ्ठल आहे. असे तिडके या भक्ताला वाटते. म्हणून वारीत असताना कधीही पैशाची तो मागणी करत नाहीत. त्याच्या सोबत वारीत आणखी पन्नास जण आहेत. ते वारीत आले ते केवळ विठ्ठलासाठीच.
पाच वर्षांपासून सोहळ्यात सहभागी होऊन माऊलींची सेवा करण्याची संधी मिळते. वारकऱ्यांनी दिलेली चांगली वागणूक हाच विठ्ठलाचा आशीर्वाद त्यांना वाटतो. दरवर्षी येणाऱ्या चांगल्या अनुभवांमुळे गावात मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचा त्यांना विसर पडतो. तृतीय समाजाकडे तिरस्काराने न पाहाता त्याला सन्मान द्यावा जेणे करून आमच्या समाजला जगण्याची इच्छा राहील. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हर्सूल दिग्रज गावात ते युवकांसाठी नवचेतना युवा विकास संस्थेच्या माध्यमातून काम करतात.