आदिवासी भाग दुष्काळी छायेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:56 AM2018-05-15T01:56:15+5:302018-05-15T01:56:15+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे, या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे, या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी मुसळधार पडणाºया पावसाची माहेरघर समजली जातात; परंतु या भागामध्ये खापर पंजोबा उपार्जित काळापासून आदिवासी बांधवांना पाण्यासाठी मैलोंमैल पायपीट करावी लागत आहे. पावसाळ्यामध्ये चार महिने मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही.
अनेक वर्षांपासून या भागातील आदिवासी बांधवांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या भागातील विहिरी, शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, तळी आदी उपलब्ध असणारे जलस्रोत पावसाळ्यामध्ये तुडुंब भरतात; परंतु उन्हाळ्यामध्ये या जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटावा, यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, कूपनलिका, पाझर तलाव यासारखे जलस्रोत काढण्यात आले आहेत; परंतु या भागात पडणाºया दुष्काळासमोर या जलस्रोतांनी गुडघे टेकले आहेत. या भागातील असणाºया जलस्रोतांमधील पाणी खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. या पाण्याची दुर्गंधी येत असून पर्यायी हेच पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे.परिणामी, सध्या या भागामध्ये आदिवासी जनतेला साथीच्या रोगांचा सामना करावा लागत आहे.
अवघ्या हाकेच्या अंतरावरती डिंभे धरण उशाला असून वर्षानुवर्ष या भागातील जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर, कोंढरे, कुशिरे, माळीण, आमडे, कोंढवळ, राजापूर, फलोदे, फुलवडे या गावांच्या मोहरेवाडी, नंदकरवाडी, गोहे खुर्द, गाडेकरवाडी, डामसेवाडी, जांभोरीची माचीचीवाडी, काळवाडी नं. १, काळवाडी नं. २, नानवडे, आहुपे, बालवीरवाडी, वनदेव, बोरघरची जायवाडी, घोडेवाडी, आवळेवाडी, माळवाडी, घोटमाळ, असाणे, जांभळवाडी, मेनुंबरवाडी, कुंभेवाडी, गवारवाडी, सावरली, गोहे बुद्रुक, बोरीचीवाडी, पाटीलबुवाचीवाडी, सायरखळा, उभेवाडी, वाल्मीकवाडी, पाचवड, पोटकुलवाडी या गावांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. या भागामध्ये जसा जसा उन्हाळा जाणवत आहे, तसतशा दुष्काळाच्या झळा आदिवासी जनतेला सोसाव्या लागत आहेत.
>ग्रामपंचायतींनी टँकरचे प्रस्ताव द्यावेत
ज्या गावांसाठी पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे, त्या ग्रामपंचायतींनी पंचायत समितीला तत्काळ प्रस्ताव द्यावेत. प्रस्ताव उशिरा आल्यामुळे हे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठवून त्यांना मंजुरी मिळण्यासाठी उशीर होतो. तालुक्यात दुष्काळावर कशी मात करता येईल, याकडे लक्ष देण्यात आले आहे. येथून पुढे ज्या गावांना टँकरची आवश्यकता आहे, अशा गावातील ग्रामसेवक, सरपंच यांना पंचायत समितीमध्ये बोलावून तत्काळ प्रस्ताव तयार करून घेऊन जिल्हाधिकाºयांकडे मंजुरीसाठी पाठवून लवकरात लवकर त्या गावांना टँकरनी पाणी पुरवठा करण्यात येईल.
- नंदकुमार सोनावले, आंबेगाव पंचायत समिती उपसभापती
सद्य:स्थितीमध्ये तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढरे, कुशिरे, माळीण, जांभोरी, तळेघर, फलोदे, गोहे सायरखळा, उभेवाडी, बोरीचीवाडी, आमडे, तर पूर्व भागातील वडगाव पीर मांदळेवाडी, निघोटवाडीची दस्तुरवाडी पारगावतर्फे खेड या गावांचे ट्रँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून, यामध्ये फक्त दोन प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये पारगाव तर्फे खेड या गावासाठी दोन टँकर व माळीण व आमडे या गावासाठी एक टँकर मंजूर झाला आहेत.