पुणे : सावित्रीबाई फुले यांच्या 189 व्या जयंतीनिमित्त पुण्यातील अहिल्यादेवी मुलींच्या शाळेने त्यांना अनाेखी आदरांजली वाहिली. सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी 1831 ला जन्म झाला. यंदा त्यांची 189 वी जयंती आहे. हाच धागा पकडत शाळेच्या 189 विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंचा पेहराव केला हाेता.
महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात त्यांना 1 जानेवारी 1848 मध्ये शाळा सुरु करुन दिली. अनेक सनातनी लाेकांचा माेठा विराेध यावेळी फुले दांपत्याला सहन करावा लागला. शाळेच्या पहिल्याच दिवशी सावित्रीबाई फुलेंवर शेणाचे गाेळे फेकण्यात आले. तरीही न डगमगता सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचे काम सुरुच ठेवले. त्यांच्यामुळे आज स्त्रीया शिक्षण घेत आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये आपले याेगदान देत आहेत.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा अनाेखा उपक्रम अहिल्यादेवी शाळेकडून राबविण्यात आला. 189 विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंसारखा पेहराव केला हाेता. तसेच त्यांच्या हातात आधुनिक यंत्रे हाेती. ही जी प्रगती स्त्रिया करु शकल्या आहेत त्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच करु शकल्या आहेत या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
हे वाचलत का ?अवघ्या अठराव्या वर्षी सावित्रीबाई फुले झाल्या पहिल्या शिक्षिका
याविषयी बाेलताना अहिल्यादेवी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल कुलकर्णी म्हणाल्या, 1848 साली महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. त्यांच्यामुळेच आज स्त्रिया शिक्षण घेऊ शकत आहेत. त्यामुळे त्यांच्या 189 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला. शाळेतील 189 विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंचा पेहराव केला हाेता. त्यांच्या हातात सध्याची अत्याधुनिक साधने हाेती. त्या माध्यमातून स्त्रियांनी आज केलेल्या प्रगती आम्हाला दाखवायची हाेती.