लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा नजीक असलेल्या पेरणे फाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना व अभिवादन दिन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनासह इतर विभाग सज्ज झाले आहे. या वर्षी मोजक्या उपस्थितीत हा मानवंदना कार्यक्रम असूनही तो यशस्वी करण्याासाठी ३ हजारपेक्षा पोलीस फौजफाटा, आरोग्य पथक, जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आज रात्री १२ पासूनच विजयस्तंभास मानवंदना व इतर कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.
कोरेगाव भीमा येथील १ जानेवारी २०२१ रोजीचे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम जरी प्रतिकात्मक असला तरी याठिकाणी बंदोबस्ताचे पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कडेकोट नियोजन करण्यात आलेले आहे. मानवंदना कार्यक्रमासाठी देशभरासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांबरोबरच विदर्भ, नागपुर, अमरावती, अकोला, यवतमाळ या भागातून जास्त प्रमाणात जनसमुदाय येतो. मुंबई, पिंपरी चिंचवड, भोसरी या भागातून व महाराष्ट्राबाहेरून देखील लोक येत असतात. कोरोनामुळे यंदा मानवंदनेसाठी पास सक्तीचे करण्यात आले आहे. ज्यांना पास असेल त्यांनाच मानवंदनेसाठी प्रवेश देण्यात येणास आहे. मानवंदनेसाठी येणाऱ्या अनुयायांनी सहकार्य करण्याचे आवाहन कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी केले.
विजयस्तंभास रात्री १२ वाजता सामूहिक बुध्द वंदना, १२ वाजून एक मिनिटांनी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व ऊर्जामंत्री नितीन राऊत हे विजयस्तंभ मानवंदनेसाठी येणार आहेत. त्यानंतर समता सैनिक दलाच्या २५० जवानांची मानवंदना होणार आहे. भीमगीतांचे कार्यक्रमही यावेळी होणार आहे. या संपूर्ण मानवंदना कार्यक्रमाचे दूरदर्शनसह इतर माध्यमांबरोबरच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने फेसबुक व युट्युबवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
अशी असेल वाहतूक...
नगरकडून येणारी सर्व जड वाहने शिक्रापूर येथील चाकण चौकातून चाकणच्या दिशेने वळतील. पुण्याहून नगरच्या दिशेने जाणारी सर्व व्यावसायिक, खासगी, प्रवासी वाहतूक करणारी जड वाहने बेरवडा- विश्रांतवाडी-आळंदी- चाकणमार्गे शिक्रापूर-नगर रोड अशी नगरच्या दिशेने जातील. पुण्याहुन नगरकडे जाण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे येरवडा-खराडी बायपासमार्गे हडपसर-पुणे-सोलापूर रस्ता-केडगाव- चौफुला- न्हावरे-शिरूर या मार्गाने पुढे नगर, सोलापूर महामार्गावरून पुणे-नगर रस्त्याच्या दिशेने लोणीकंदकडे येणारी सर्व वाहने हडपसर-मगरपट्टा- खराडी-बायपासमार्गे येरवडा- विश्रांतवाडी- आळंदी- चाकणमार्गे पुन्हा शिक्रापूरकडून नगरच्या दिशेने जातील. आळंदीकडून पुणे-नगर महामार्गाकडे जाणारी सर्व वाहने मरकळ-शेलपिंपळगाव ते शिक्रापूर या मार्गाने पुढे नगरकडे जातील. आळंदीकडून सोलापूर रस्त्याकडे जाणारी सर्व वाहने विश्रांतवाडी-येरवडा-खराडी बायपास ते हडपसरमार्गे सोलापूरकडे जातील.