गुटखा तस्कराकडून ‘अन्न औषध’च्या अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न
By admin | Published: January 24, 2017 12:09 AM2017-01-24T00:09:03+5:302017-01-24T00:09:03+5:30
शिवडेतील घटना : अपघातग्रस्त कारमध्ये होता १२० पोती गुटखा; संशयित पसार
कऱ्हाड/उंब्रज : अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना २ लाख ७० हजार रुपये किमतीची गुटख्याच्या पुड्या भरलेली तब्बल १२० पोती आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करून आरोपीसह मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात दिला. गुटखा तस्करांनी ‘अन्न व औषध’च्या अधिकाऱ्याला कारमधून खाली ढकलून चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी व अन्य दोघेजण गुटख्याने भरलेल्या गाडीसह पसार झाले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील शिवडे हद्दीत सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.
ओमप्रकाश वीरभाराम बिष्णोई (रा. बिबेवाडी, पुणे) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड शहर गुंजवटे, सहायक निरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह पथक रविवारी रात्री गस्त घालत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास हे पथक कोल्हापूर नाका परिसरात असताना साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या कारचा (एमएच १२ एलव्ही ५७५६) टायर फुटल्याने कार दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झाली. घटना निदर्शनास येताच पोलिस पथक तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी कारचा चालक ओमप्रकाश बिष्णोई याला कारमधून खाली उतरवले. तसेच कारची पाहणी केली. त्यावेळी कारमध्ये गुटख्याच्या पुड्या भरलेली तब्बल १२० पोती आढळून आली. पोलिसांनी चालक बिष्णोई याच्यासह संबंधित कार ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणली. कायदेशीर कार्यवाही पार पडल्यानंतर शहर पोलिसांनी या कारवाईची माहिती साताऱ्याच्या अन्न व औषध प्रशासनला दिली.
सकाळी अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र काकडे, राहुल खंडागळे व नमुना सहायक सुनील सर्वगोड असे तिघेजण कऱ्हाडला दाखल झाले. त्यांनी जप्त केलेल्या गुटख्याचा पंचनामा केला. तसेच आरोपी बिष्णोई याच्यासह संबंधित गुटखा ताब्यात घेतला. गुटखा व आरोपीला साताऱ्याला नेण्यासाठी खासगी कारची आवश्यकता होती. त्यावेळी आरोपी बिष्णोई यानेच त्याच्या एका मित्राला कार (एमएच १४ एफएक्स ७१२४) घेऊन पोलिस ठाण्यात बोलवले. काही वेळानंतर संबंधित मित्र व अन्य एकजण कार घेऊन पोलिस ठाण्यात आले. त्या कारमध्ये गुटखा भरण्यात आला. तसेच अन्न व औषधचे नमुना सहायक सुनील सर्वगोड, चालक व अनोळखी एकजण त्या कारमध्ये बसला. संबंधित कार साताऱ्याकडे मार्गस्थ झाली. तर त्यापाठोपाठ अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र काकडे व राहुल खंडागळे आरोपी बिष्णोई याला घेऊन कारने साताऱ्याकडे निघाले.
दरम्यान, संबंधित कार व कार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिवडे गावच्या हद्दीत गणेश हॉटेलनजीक पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी जेवण करण्यासाठी वाहने थांबविली. त्याठिकाणी आरोपीसह सर्वांनी जेवण केले. त्यानंतर सर्वजण गाडीत बसण्यासाठी निघाले. कारचा चालक व त्याच्यासोबतचा अनोळखी व्यक्ती कारमध्ये बसला. बिष्णोईही धावत जाऊन कारमध्ये चढला. त्याने अन्न औषधचे नमुना सहायक सर्वगोड यांना खाली ढकलून दिले. तसेच त्यांच्या अंगावर कार घालण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी बिष्णोई याच्यासह संबंधित कारचा चालक व अनोळखी एकजण २ लाच ७० हजारांचा गुटखा घेऊन पुण्याच्या दिशेने पळाले. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र काकडे यांनी उंब्रज पोलिसांत फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव जगताप तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
गुटख्याची पुण्यात विक्री
आरोपी ओमप्रकाश बिष्णोई हा कर्नाटकच्या निपाणी भागातून गुटख्याची खरेदी करीत होता, अशी माहिती शहर पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वी तो जीप घेऊन कर्नाटकला गेला होता. तेथे त्याने पावणे तीन लाखांचा गुटखा खरेदी केला. हा गुटखा तो पुण्यात विकणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चालकाचा फोटो पोलिसांना मिळाला
आरोपी बिष्णोई याला कारमधून पळवून घेऊन जाणाऱ्या चालकाचा फोटो पोलिसांना मिळाला आहे. संबंधित चालक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच तो राजस्थानचा आहे. मात्र, त्याचे नाव व इतर माहिती रात्री उशिरापर्यंत पोलिसांना मिळाली नव्हती. पोलिसांनी फोटोवरून त्या चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
गुटख्याची पुण्यात विक्री
आरोपी ओमप्रकाश बिष्णोई हा कर्नाटकच्या निपाणी भागातून गुटख्याची खरेदी करीत होता, अशी माहिती शहर पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी तो जीप घेऊन कर्नाटकला गेला होता. तेथे त्याने पावणे तीन लाखांचा गुटखा खरेदी केला. हा गुटखा तो पुण्यात विकणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चालकाचा फोटो पोलिसांना मिळाला
आरोपी बिष्णोई याला जीपमधून पळवून घेऊन जाणाऱ्या चालकाचा फोटो पोलिसांना मिळाला आहे. संबंधित चालक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच तो राजस्थानचा आहे. मात्र, त्याचे नाव व इतर माहिती रात्री उशिरापर्यंत पोलिसांना मिळाली नव्हती. पोलिसांनी फोटोवरून त्या चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.