लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अनधिकृतपणे घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन बेटिंग घेणाऱ्या व खेळणाऱ्या ३१ जणांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता या प्रकरणात शहर पोलीस टर्फ क्लबमधील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे. बेटिंग प्रकरणी टर्फ क्लबमधील कोणाचा समावेश आहे का तसेच तेथील कोणी या प्रकरणात मदत करत होते का, या अनुषंगाने चौकशी करणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख उपस्थित होते.
वानवडी, कोंढवा व हडपसर परिसरात अवैध प्रकारे विनापरवाना बेकायदेशीररित्या घोड्यांचे शर्यतीवर दुसऱ्याचे नावाचे सीमकार्ड वापरुन फोनद्वारे व ऑनलाईन सट्टा लावून जुगाराचा खेळ खेळण्याचे गैरप्रकार चालू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापे टाकून ३१ जणांना अटक केली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, मनिष अशोक अजवानी व मतीन कदीर खान या दोन प्रमुख बुकींचा अटक् केलेल्यांमध्ये समावेश आहे. मनिष हा प्रमुख बुकीमेकर असून तो इतर शहरातून बेटिंग घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग घेण्यास टफर् क्लबच्या आवारात परवानगी असते.
बुकींना परवाना घेऊन त्या ठिकाणी स्टॉल टाकता येतात. पण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ॲप व मोबाईलच्या माध्यमातून बेटिंग घेतले जात होते. बेटिंग घेण्यासाठी काही कर्मचारी नेमलेले आढळून आले. त्या ठिकाणी मोठ्या स्कीन लावलेल्या होत्या. तसेच आरोपी वापरत असलेले सीमकार्ड हे दुसर्याच्या कोणाच्या तरी नावावर असल्याचे आढळले आहे. या सर्व प्रकार टफर् क्लबच्या अधिकार्यांना माहित होता का, त्यांच्यापैकी कोणी कर्मचार्यांचे यात संगनमत आहे का याचा तपास सुरु असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
बेटिंगसाठी ॲप
पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले की, रेसकोर्समध्ये ज्या बुकींना अधिकृत परवाना मिळालेला आहे त्यांना बेटिंग घेण्याचा अधिकार आहे. मात्र, रेस-९९९ अशासारख्या वेबसाईटच्या माध्यामूतन लाईव्ह रेस पाहून तसेच विशिष्ट अॅप विकसित करुन बेकायदेशीरपणे हे बुकी बेटिंग घेत होते. बुकींवर कारवाई करण्यात आल्यानंतर दोन दिवस ते पोलिसांना आम्ही अधिकृत असल्याचे सांगतात. परंतु, अद्याप एकानेही अधिकृत परवाना किंवा कागदपत्रे सादर केलेली नाही.
स्थानिक परिमंडळ, पोलीस ठाणे अनभिज्ञ
संपूर्ण कारवाई परिमंडळ ५ च्या व वानवडी, कोंढवा, हडपसर परिसरात झाली. पोलीस आयुक्तांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी परिमंडळ ४ मधील काही अधिकारी यांना या कारवाईत सहभागी करुन घेतले. या कारवाईचा इतरांना सुगावा लागू नये, म्हणून त्यांनी चक्क परिक्षाविधीन पोलीस अधिकाऱ्यांना या कारवाईत सहभागी करुन घेतले होते. संपूर्ण कारवाई होईपर्यंत स्थानिक पोलीस ठाण्यांना याचा सुगावा लागू दिला नाही.