जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. बुधवार (दि. ८)पासून सुरू झालेल्या बाजारात विविध जातींच्या गाढवांची खरेदी-विक्री होत असून या बाजारात दोन दिवसांत तीन कोटींची उलाढाल झाली आहे.जेजुरीत भरणारी पौष पौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवून गडाच्या पायथ्याला असलेल्या बंगाली पटांगणात शेकडो वर्षांपासून येथे राज्यातून व राज्याबाहेरून गावगाड्यातील आलेला बारा बलुतेदार परंपरेतले विविध जातींचे समाजबांधव गाढवांची खरेदी-विक्री करतात. मात्र, सध्या सगळा रोखीचा मामला झाला आहे. या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र या राज्यांसह महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कराड, बार्शी, नगर, बारामती, पुणे, फलटण, जामखेड आदी ठिकाणांवरून वैदू, वडार, कैकाडी, बेलदार (पाथरवट) आदी समाजबांधव येथे विविध जातींच्या गाढवांसह दाखल होतात. गाढवांच्या खरेदी-विक्रीबरोबरच देवदर्शन, कुलधर्म-कुलाचार आदी धार्मिक कार्यक्रम येथे होतात.पूर्वीच्या काळी गाढवांचा वापर जड मालाच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असे. आजच्या यांत्रिक युगामध्ये ओझे वाहण्यासाठी गाढवांचा वापर कमी झाला असला, तरी दऱ्या खोऱ्यांमध्ये व डोंगरमाथ्यावर, बहुमजली इमारतीच्या ठिकाणी अथवा जेथे वाहन जाणार नाही अशाठिकाणी मालाची वाहतूक करण्यासाठी गाढवांचा वापर आजही केला जातो. यंदाही दीड हजार विविध जातींची गाढवे जेजुरीच्या बाजारात दाखल झाली होती. विशेषत: राजस्थानी-काठेवाडी जातीच्या गाढवाला सर्वांत जास्त २५ ते ४० हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. तर, गावरान -पुणेरी गाढवाला ७ ते २० हजार रुपये भावाची बोली लागत होती. राजस्थानी-काठेवाडी गाढव पांढरेशुभ्र असेल तर त्याला जास्तीचा बाजारभाव मिळत होता. कर्नाटक-आंध्र येथून आलेले व्यापारी भावांमध्ये घासाघीस करताना दिसून येत होते. पूर्वीच्या काळी गारुडी, कुंभार, परीट समाजबांधवही बाजारात दिसून येत. आता मात्र फक्त मोजकेच समाजबांधव खरेदी-विक्री करताना दिसतात. ............
गाढवाच्या दातावरून त्याच्या वयाचे अनुमान काढले जाते. दोन दातांचे ‘दुवान’ हे गाढव तरुण मानले जाते. चार दातांचे ‘चौवान’ हे मध्यमवयीन, तर ‘कोरा’ म्हणजे नुकतेच वयात येणारे असे अनुमान काढत त्यांचे दर ठरवले जातात. रंगावरूनही किमत करण्यात येते. पांढºयाशुभ्र जनावराला चांगला दर मिळतो. या बाजारात प्रथमच काळ्या रंगाचे उमदे जनावर भाव खात होते. त्यानंतर गडद जांभळा, तपकिरी लालसर, करडा अशा रंगाच्या प्रतवारीनुसार दर आकारले जात असल्याची माहिती पुणे येथील व्यापारी बापू धोत्रे यांनी दिली.
पूर्वीच्या काळी येथील बाजारात व तीन ते चार दिवस चालणाºया यात्रेत गाढवांच्या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असे; परंतु सध्या परिस्थिती तशी राहिलेली नाही. केवळ वाडवडिलांनी घालून दिलेली येथील परंपरा जोपासण्यासाठी ही यात्रा करायची, असे काही समाजबांधवांनी सांगितले.
पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत भातू कोल्हाटी आणि वैदू समाज यांच्या जातपंचायती भरतात. मात्र, या जातपंचायती वादग्रस्त ठरल्याने दोन वर्षांपासून त्या बंद झालेल्या आहेत. पोलिसांकडून परवानगी नसल्याने त्या याही वर्षी होणार नाहीत. काल ‘लोकमत’ने या बाजारातील असुविधांबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी घेतली. ‘यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांना कोणत्याही असुविधा निर्माण होऊ नयेत, यात जातीने लक्ष घालत आहे. त्याचबरोबर ही परंपरा जतन करण्यासाठी पालिका प्रशासनासह आम्ही सर्वच जण भविष्यात योग्य ते नियोजन करू,’ असेही त्यांनी म्हटले आहे.