किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:33 AM2018-06-16T03:33:12+5:302018-06-16T03:33:12+5:30
उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर शुक्रवारी पुन्हा शाळेची पहिली घंटा वाजली. शाळेमध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट, पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवसासाठी शाळा खास फुगे व आर्कषक सजावट करून सजवल्या होत्या.
पुणे - उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर शुक्रवारी पुन्हा शाळेची पहिली घंटा वाजली. शाळेमध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट, पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवसासाठी शाळा खास फुगे व आर्कषक सजावट करून सजवल्या होत्या. शिशुगट, नर्सरीमधील मुलांसाठी नेहमीप्रमाणे पहिला दिवस हा अत्यंत खास ठरला. शाळेत सोडायला आलेल्या आई-वडिलांना बिलगून रडत, ओरडत त्यांचा पहिला दिवस पार पडला.
सुट्ट्यांमध्ये अनेक दिवस बंद असलेल्या शाळा शुक्रवारी चिमुकल्यांच्या गोंगाटाने पुन्हा एकदा जिवंत झाल्या. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती. छोटा भीम, मिकीमाऊस विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आले होते. शाळांचे वर्ग, परिसराची स्वच्छता केली होती. सुंदर फुलांनी व आकर्षक फुग्यांनी वर्ग सजवले होते. पहिल्यांदाच शाळेत पाऊल ठेवत असलेली नर्सरी, बालवाडीतील मुले पालकांना सोडून शाळेत बसायला तयार नव्हती, त्यांचा रडण्याचा सामूहिक कार्यक्रमही अनेक शाळांमध्ये रंगला. मोठ्या वर्गांमध्ये अनेक दिवसांनी शाळेतले मित्र-मैत्रिणी पुन्हा भेटल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. एकमेकांना कडकडून मिठ्या मारून या भेटीचा आनंद साजरा केला जात होता. पहिला दिवस असल्याने शिक्षकांनी आज लगेच शिकविण्याला सुरुवात करण्याऐवजी मुलांशी गप्पागोष्टीवर भर दिला.
न्यायमूर्ती रानडे बालक मंदिरात सनईचे सूर निनादत होते. रांगोळी, फुग्यांची सजावट आणि स्वागतासाठी छोटा भीम, डोरोमॉन उपस्थित होते. अहिल्यादेवी शाळेत पाटीपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. नवीन मराठी शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये वाचनसंस्कृतीचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर केली.
विठ्ठलराव ताकवले बालक मंदिरमाध्ये प्रवेशोत्सव साजरा केला. मुख्याध्यापक श्याम धुमाळ, पुष्पा खंडाळकर, रेखा पडवळ उपस्थित होते. प्रतिभा पवार विद्यामंदिरामध्ये ढोल-ताशा व लेझीमच्या गजरात स्वागत केले. स्मिता पाटील विद्यालयात पाठपुस्तकांचे वाटप करण्यात आले. कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत केक देऊन स्वागत केले.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना खाऊवाटप केला. मा. स. गोळवलकर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. पर्यावरण रक्षणाचा संदेश, प्रबोधनपर गाणी आणि कथा सांगण्यात आल्या. डीईएस प्रायमरी स्कूल मातृमंदिर या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षण करून करण्यात आले. पपेट शो, नृत्य, गाणी, गोष्टी, बैठ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
८१ वर्षांनंतर मुलींनाही प्रवेश
टिळक रस्त्यावरील १८८० मध्ये स्थापन झालेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ८१ वर्षांनी पहिल्यांदाच मुलींना प्रवेश देण्यात आला. पालक, माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन मुला-मुलींना एकत्र सहशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्याध्यापक नागेश मोने यांनी सांगितले. राम गणेश गडकरी, केशवसुत, बाळासाहेब खेर, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, गोपीनाथ तळवलकर असे प्रतिभावंत विद्यार्थी घडविणाºया या शाळेत यावर्षी इयत्ता पाचवीत ३० विद्यार्थिनींना प्रवेश देण्यात आला.
सेल्फी अन् फोटोची क्रेझ
शाळेमध्ये पहिल्या दिवशी आपल्या चिमुकल्यांना सोडताना सेल्फी, फोटो घेऊन आठवणींचे जतन केले जात होते. पालकांच्या हातात असलेल्या स्मार्ट फोनवर असंख्य फोटो काढले जात असल्याचे सार्वत्रिक चित्र पूर्व प्राथमिक शाळांमध्ये दिसून आले.
प्लॅस्टिक न वापरण्याचा संकल्प
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या एन.सी.एल. प्री-प्रायमरी व प्रायमरी शाळेत ‘आम्ही प्लॅस्टिक वापरणार
नाही, पृथ्वीचा समतोल ढळू देणार
नाही’ असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कुमुदिनी चिकणे, चिंतामणी घाटे उपस्थित होते.
महापौरांनी घेतला पहिला तास
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महापौर मुक्ता टिळक यांनी ५ वर्गांत पहिला तास घेतला. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या मागे न लागता अवांतर वाचनावर भर द्यावा. लोकमान्य टिळक, समाजसुधारक आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर या धुरिणांनी स्थापन केलेल्या या शाळेत सुरुवातीच्या काळात वर्गात बेंच नव्हते. मुलांना जमिनीवर बसावे लागायचे. ही जमीन खडबडीत व खड्डेयुक्त होती. लोकमान्यांनी मुलांची गैरसोय व्हायला नको म्हणून स्वत: खड्डे बुजवून जमीन शेणाने सारवून घेतली.