—उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : ‘पवारसाहेबां’च्या विनंतीवरून बजाज समूहाच्या वतीने दीड लाख कोरोना लसीचे डोस उपलब्ध करून दिले. त्यामुळे एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजेच अडीच लाख लसीकरण करण्याचा विक्रम जिल्ह्याने केला. हा देशातील उच्चांक केला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री पवार शनिवारी बारामती दौऱ्यावर होते. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. पवार म्हणाले की, पवारसाहेबांनी बजाज समूहाला विनंती केली की आपले विविध उद्योग पुण्यासह महाराष्ट्रात आहेत. तुमचे पुण्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी द्या. त्यानंतर बजाज समूहाचे राहुल बजाज यांनी तत्काळ दीड लाख डोस उपलब्ध करून दिले. त्यातून एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण करण्याचा विक्रम पुणे जिल्ह्याने केला.
आपण समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून आम्ही काम करत असतो. आम्हाला याचे समाधान वाटते की, आपल्या कारकिर्दीत विविध कामे करू शकलो याचे एक वेगळे समाधान आहे. मागील काळात विकासकामात खंड पडला. मागील टर्ममध्ये आपल्या विचाराचे सरकार असते, तर बारामतीला कुठल्या कुठे नेऊन ठेवले असते. देशात विविध बाबतीत नंबर एकचा तालुका म्हणून बारामतीची ओळख निर्माण केली असती.परंतु जर-तर ला काही महत्त्व नसते. मात्र, सध्या कोरोनाचे सावट असतानाही विकासकामांवर आपण त्याचा परिणाम होऊ दिला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
———————————————
...कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही
ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय आगामी निवडणुका घेऊ नये, अशी भूमिका राज्य सरकारसह सर्वच पक्षांनी मांडली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आम्ही मिळून सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, त्यामुळे तिळमात्र शंका बाळगू नका. कोणत्याही मागासवर्गीय, अल्पसंख्याक, बहुजन वा ओबीसी अशा कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही भूमापन ड्रोन सर्वेक्षण कामाचा शुभारंभ करताना दिली. कोणत्याही समाज घटकावर अन्याय होऊ न देता सर्वच समाजाला पुढे घेऊन जाण्याचे जे गेल्या पन्नास वर्षांच्या राजकारणात पवारसाहेबांनी केले, तेच काम पुढे नेटाने घेऊन जाण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आहे, असे त्यांनी सांगितले.