लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतीमध्ये पाण्याचा वापर कमी व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून ठिबक तसेच तुषार सिंचन राबवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येते. मात्र, त्याला जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. सन २०१९ मध्ये पात्र ठरलेल्या ८ हजार ७४५ पैकी २ हजार ६४० शेतकऱ्यांना अद्याप त्यांचे अनुदान मिळालेले नाही.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत सन २०१९-२० मध्ये फक्त १८ हजार शेतकºयांनी यासाठी अर्ज केले होते. त्यातील ५ हजार ९२० अर्ज अपात्र ठरल्याने रद्द झाले. राहिलेल्या १२ हजार ९६६ अर्जदारांपैकी नियमानुसार ज्यांचे पुर्वतपासणी कृषी खात्याने केली असे फक्त ८ हजार ७४५ जण होते. त्यांनी त्यांच्या शेतात ही योजना करून घेतली. त्यामुळे ते अनुदानासाठी पात्र ठरले, मात्र फक्त ६ हजार १०५ जणांनाच आतापर्यंत अनुदान मिळाले आहे.
ठिबक व तुषार अशा दोन पद्धतीने सिंचन प्रकल्प राबवले जातात. दोन्हीसाठी अनूदान दिले जाते. त्यात अत्यल्प भूधारकाला ५५ एकूण खर्चाच्या ५५ टक्के व अन्य शेतकऱ्यांना ४५ टक्के रक्कम दिली जाते. फक्त ५ हेक्टर क्षेत्रासाठीच अनुदान मिळते. त्यापेक्षा जास्त मिळत नाही. जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ठिबकसाठी ४ हजार ४३९ व तुषारसाठी १ हजार ६४६ असे एकूण ६ हजार १०५ जणांना अनुदान मिळाले आहे. प्रकल्प करूनही अनुदान मिळाले नाही अशांची संख्या २ हजार ६४० आहे. त्यांना पुढील आर्थिक वर्षात सामावून घेतले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.
ज्यांचे अनुदान प्रलंबित आहे त्यांना ते त्वरीत मिळावे यासाठी जिल्हा कृषी कार्यालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसात त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळेल. ठिबक व तुषार या सिंचनाच्या पद्धतीचा वापर व्हावा यासाठी कृषी खाते प्रयत्न करत आहे. या पद्धती खर्चिक असल्याने शेतकºयांकडून त्याला फारशी पसंती मिळत नसावी.
- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय.