लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : दौंडला भीमा नदी पत्रात वाळूमाफियांनी खोदलेल्या खड्ड्यात साठलेल्या पाण्यात दोन लहान मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१८) दुपारी १२ च्या सुमारास घडली.
ओएझ मुझफ्फर शेख (वय १३), आदील महेबूब शेख (वय १८, दोघे ही राहणार पानसरे वस्ती, दौंड) अशी मृत मुलांची नावे आहेत. ओएझ आणि आदील हे दोघे दौंड येथे भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी नदी पात्रात उड्या मारल्या विषेश म्हणजे या दोघांनाही पोहता येत होते. मात्र, या दोघांनी पाण्यात ज्या ठिकाणी उड्या मारल्या त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला असल्याने याठिकाणी मोठा खोलवर खड्डा पडलेला होता. हे दोघेही तरुण खोलवर खड्ड्यात अडकून पाण्यात बुडाले. यावेळी दोघेही मदतीसाठी आरडाओरडा करू लागले. नदीकाठी असलेल्या व्यक्तींनी या मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने पाण्यातून दोघांचे मृतदेह हाती आले. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. आदील आणि ओएझ हे दोघे ही दौंड येथील पानसरे वस्तीवर शेजारी शेजारी राहण्यास असून दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहे. यातील आदीलचे वडील महेबूब शेख यांचे दीड महिन्यांपूर्वी आजाराने निधन झाले होते. तर आज आदीलचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या कुटुंबात आई, दोन मुले, एक मुलगी आहे. तर ओएझ शेख याचा लहान भाऊ फैजान याचा दोन वर्षांपूर्वी आजाराने मृत्यू झाला असल्याने आता या कुटुंबात फक्त आई वडील आणि एक मुलगी आहे. त्याचे वडील मोलमजुरी करतात. या घटनेमुळे दौंड शहरात शोककळा पसरली आहे.
फोटो १) ओऐझ आणि आदील
फोटो २) दौंड येथील भीमा नदी पात्रात खडकाच्या परिसरातील वाळू उपसा करून वाळूमाफियांनी केलेल्या खड्ड्यातील पाण्यात दोघा तरुणांना प्राण गमवावे लागले
( फोटो मेल केले आहे )