बारामती : तो काळ १९७५ चा असेल. त्यावेळी अप्पासाहेबकाका आणि भाऊसाहेबकाकांनी गायी आणायच्या ठरवल्या. त्या गायी आणण्यासाठी बेंगलोरला मला आणि राजूदादाला पाठवले. त्यावेळी आम्ही दोघे १५— १६ वयाचे असू. स्कूटर घेऊन जाणाऱ्या तीन ट्रकमध्ये २४ गायी आम्ही आणल्या. गायी आणताना दोन रात्री व दोन दिवसांचा प्रवास केला. या दरम्यान, गायींचे मध्येच दूध काढले, त्यानंतर ते दूध हॉटेलवाल्यांना विकले. शेण काढायचे. रस्त्याला दिसेल तेथे पाणी शेंदायचे. आज पवार कुटुंबीयांनी मिळविलेल्या यशामागे आम्ही केलेले बरेच काम आहे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.बारामती एमआयडीसीतील गदिमा सभागृहात अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार यांनी मिश्कीलपणे कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला. तसेच बंधुत्वाच्या लहानपणीच्या आठवणी जागविल्या. या वेळी पवार म्हणाले, आबा (ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वडील गोविंदराव पवार) आणि बाईंनी (ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आई शारदाबाई पवार) संपूर्ण पवार कुटुंब वाढविले. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दुसºया पिढीने देखील खूप कष्ट केले. अडचणीच्या काळातही प्रत्येकाला संस्कार देऊन शिक्षित केले. एसटीच्या प्रवासात जेवणाचे डबे विटायचे. मात्र सगळ्या काकांनी तसले डबे खाऊन आपापले शिक्षण पूर्ण केले. तिसरी पिढी म्हणून आमच्यावर प्रेशर होते.राजूदादा माझ्यापेक्षा १३ महिन्यांनी मोठा आहे. आमचे एकमेकांना सगळे माहिती आहे. त्यामुळे मी राजकारणात आल्यावर आम्ही एकमेकांचे काहीच सांगितले नाही. सर्व झाकून ठेवले. तुम्ही किती वाकून पाहिले तरी तुमच्या हाती काहीच येणार नाही, असे म्हणून अजित पवार काही क्षण थांबले. त्यानंतर ‘आमचे बर चाललंय, तुम्हाला पवार अजूनही समजलेच नाहीत, असे मिश्कीलपणे पवार म्हणाले. त्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.या वेळी बारामती एमआयडीसीतील गदिमा सभागृहात अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनीदेखील त्यांच्या भाषणातून कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला.>...गिरगावच्या चौपाटीवरील वाळूत आम्ही रात्र काढलीत्यावेळी शरदकाका मुंबईत होते. आम्ही मुंबईत एका कामासाठी गेलो होतो. माझ्याकडून काही चूक झाली होती. शरदकाका रागावतील या भीतीने आम्ही तिकडे गेलोच नाही. मात्र, मुंबईत गिरगावच्या चौपाटीवरील वाळूत आम्ही रात्र काढली. अशी जुन्या काळातील मुंबईची आठवण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली. ही आठवण ऐकताना सभागृह स्तब्ध होते.
गायी आणताना दोन दिवसांचा केला प्रवास -अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:20 AM