बारामती : सोनगाव (ता. बारामती) येथे कऱ्हा नदीच्या पात्रातील गाळ काढताना पोकलेन मशिनखाली दोघेजण चिरडल्याची घटना शनिवारी (दि. ७) पहाटे घडली. या वेळी बाजूला पळून गेल्याने एक जण बचावला. याप्रकरणी पोकलेनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत पोकलेनचालकाला अटक करण्याची कारवाई सुरू होती. बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनगाव येथे कऱ्हा नदीच्या पात्रात जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू होते. या वेळी सकाळपासूनच गाळ काढण्याचे काम सुरू होते. शनिवारी मध्यरात्री आरोपी मुसाफिरअली नजरमुल्ला मन्सुरी (वय २२, धरणी छप्पर, ता. कटियाँ, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) पोकलेन मशिन चालवित होता. या वेळी मध्यरात्री झोप आल्याने चालक मन्सुरी पोकलेन लावण्यासाठी निघाला होता. मात्र, चढावर झोपलेले तिघे जण त्याला दिसले नाहीत. चढावरून जाताना झोपलेले पोकलेनचालक नाजीरअली हमीदमियाँ मन्सुरी (वय २२, ग्रामबरीया, कोट्या, गोपालगंज ,उत्तर प्रदेश) याच्यासह हेल्पर रामभवन हरिबंस प्रजापती (वय ३१, रा. ग्रामफै ला, ता. चौरीचौरा, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) या दोघांच्या अंगावरून पोकलेन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर या दोघांसमवेत झोपलेला सद्दाम हुसेन मुसल्ली मियाँ (वय २२, वसया, बिहार) हा पळून गेल्याने बचावला. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुसाफिरअली मन्सुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले आहेत. अधिक तपास सहायक फौजदार भीमराव वायाळ करीत आहेत.
पोकलेनखाली दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2016 3:21 AM