Pune: आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणी निवृत्त जवानासह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 12:46 PM2021-12-07T12:46:10+5:302021-12-07T12:48:37+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुतेकर हा निवृत्त जवान आहे. तो २०१९ मध्ये लष्करातून निवृत्त झाला आहे...
पुणेःआरोग्य विभागाच्या लेखी परिक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी मुंबई डॉकयार्डमधील एक खलाशी आणि निवृत्त जवानाला अटक केली आहे. त्यामुळे या पेपर फुटीमध्ये अटक झालेल्यांची संख्या ६ झाली आहे. या पेपरफुटीचे धागेदोरे एका शिक्षकापर्यंत पोहचले असून ते आरोग्य विभागापर्यंत जाण्याची शक्यता आहे. संदीप रामराव भुतेकर (वय ३८, रा. औरंगाबाद) आणि प्रकाश मिसाळ (वय ४०, रा. मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी या प्रकरणात विजय प्रल्हाद मुर्हाडेला (वय २९, रा. नांदी, ता. अंबड, जिल्हा. जालना), अनिल गायकवाड (वय ३१) आणि बबन बाजीराव मुंढे (वय ३२, रा. बुलढाणा) आणि सुरेश जगताप (वय २८) यांना अटक करण्यात आली असून, हे आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुतेकर हा निवृत्त जवान आहे. तो २०१९ मध्ये लष्करातून निवृत्त झाला आहे. तो औरंगाबाद येथे सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण देणारी नवस्वराज्य नावाने करिअर ॲकडमी चालवितो. तर मिसाळ हा डॉकयार्ड येथे खलाशी आहे. मिसाळ याचा एक नातेवाईक बीडमध्ये शिक्षक आहे. त्याच्याकडून मिसाळ याला पेपर मिळाला होता. मिसाळ याने तो ३ एजंटांना व भुतेकर याला दिला होता. दोघांनी त्यांच्याकडील उमेदवारांना सकाळी सहा वाजता बोलवून ९२ प्रश्न व त्याची उत्तरे सांगत ती पाठ करून घेतली होती. मिसाळ याने ३ एजंटामार्फत चाकण परिसरात ३० उमेदवारांना बोलवून उत्तरे सांगितली. तर भुतेकर याने २३ विद्यार्थ्यांकडून उत्तरे पाठ करून घेतल्याचे समोर आले आहे. मिसाळ याला मदत करणारे दोन एजंट अद्याप फरार आहेत. या आरोपींकडे तपास केल्यानंतर पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य विभागापर्यंत पोहचत असल्याचे दिसून आहे.
सहा ते सात लाखांचा रेट
पेपर देण्याच्या बदल्यात एका उमेदवाराकडून ६ ते ७ लाख रुपये घेण्याचे ठरले होते. त्यापैकी ५० हजार रूपये आरोपींना मिळणार होते. बाकीची रक्कम त्यांना वरती द्यावी लागणार होती. उमेदवारांनी अद्यापपर्यंत पैसे दिले नव्हते. मात्र, यादीमध्ये नाव आल्यानंतर त्यांना पैसे द्यावे लागणार होते. त्यासाठी आरोपींनी उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे ठेवून घेतली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून उमेदवारांची मूळ कागदपत्रे देखील जप्त केली आहेत.
धागेदोरे आरोग्य विभागापर्यंत
सायबर पोलिसांना फुटलेल्या पेपरवर विजय मुर्हाडेला याचे नाव आढळून आले होते. त्याला अटक केल्यावर त्याने आपल्याला हा पेपर भुतेकर याच्याकडून मिळाल्याचे सांगितले. त्यातून अनिल गायकवाड, बबन मुंढे याची लिंक मिळाली. त्यांच्याकडून मिसाळ याचे नाव पुढे आले. मिसाळ याला त्याच्या एका शिक्षक असलेल्या नातेवाईकाकडून हा पेपर मिळाला होता. या शिक्षकाचा तसेच आणखी दोन एजंटाचा शोध सुरु आहे.