ससूनमध्ये दाखल असताना ललित पाटील याच्याकडून दोन मोबाईल जप्त
By नम्रता फडणीस | Published: October 9, 2023 06:38 PM2023-10-09T18:38:03+5:302023-10-09T18:38:27+5:30
ललित पाटील याच्यासह तीनही आरोपींच्या नाशिक येथील घरांची पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये पेन ड्राईव्ह आणि मोबार्इल असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त
पुणे : ससूनमध्ये दाखल असताना मेफेड्रोन हा अमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्याचे पासवर्ड देण्यास त्याने नकार दिल्याने मोबार्इलचा सीडीआर काढण्यात येत आहे. मोबाईलचा पासवर्ड उघडण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र अद्याप पासवर्ड मिळालेला नाही. पासवर्डसाठी अॅपल कंपनीशी देखील संपर्क साधण्यात आला आहे, असे पोलिसांनीन्यायालयात दाखल केलेल्या रिमांडमध्ये नमूद आहे.
दरम्यान, ललित पाटील याच्यासह तीनही आरोपींच्या नाशिक येथील घरांची पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये पेन ड्राईव्ह आणि मोबार्इल असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले आहेत. त्यातील डेटाचे विश्लेषण करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आली. या गुन्ह्यात आत्तापर्यंत पाटील याला दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन देण्यासाठी आलेला साथीदार सुभाष मंडल (वय 29, रा, देहू रस्ता, मुळ रा. झारखंड) आणि ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील कर्मचारी रौफ रहीम शेख (वय 19 रा. ताडिवाला रस्ता) यांना अटक करण्यात आली आहे. तर पोलिस मुख्य आरोपी ललित पाटील (वय 34), भूषण सुभाष पाटील (रा. नाशिक) आणि अभिषेक विलास बलकवडे यांचा शोध घेत आहेत. पाटील याला पळून जाण्यास मदत करणारा त्याचा वाहन चालक दत्ता डोके याला देखील अटक करण्यात आली आहे. मंडल आणि शेख यांची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना सोमवारी (दि..9) न्यायालयात हजर करण्यात आले होते.
मंडल व शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी आरोपींकडे एकमेकांसमोर सक्षम तपास करायचा आहे. पाटील याच्या मदतीने शेख याने इतर कोणाला अमली पदार्थ विकले आहेत. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने अटक आरोपींनी अधिक विश्वासात घेऊन सीडीआरच्या आधारे त्यांच्याकडे तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वामन कोळी यांनी केला. न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.