पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता विनायक शिरसाट याच्या हत्याप्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना तेलंगणा येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे.
विनायक शिरसाट याची हत्या माहिती अधिकारासंबंधी नाही तर वैयक्तिक कारणातून झाल्याचे समजते. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांना पुण्यात आणल्यानंतर त्यांच्या चौकशीतून नेमके कारण पुढे येणार असून मुख्य आरोपीला पकडल्यानंतर ते अधिक स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकत्याचे अपहरण करुन त्यांची हत्या करुन मुळशी तालुक्यातील पिरंगुट ते लवासा दरम्यान दरीत टाकून दिल्याचे उघड झाले आहे. विनायक सुधाकर शिरसाट (वय ३२, रा. कात्रज) असे त्यांचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार आठ दिवसांपूर्वी देण्यात आली होती.
तर शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांना धमक्या आल्या होत्या, याची माहिती दिल्यानंतरही पोलीस १० दिवस हातावर हात धरुन बसले. त्यामुळे या हत्येमागे हात असलेल्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा शिरसाट यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे.