पिंपरी चिंचवडमधील गोल्डमॅन दत्ता फुगेच्या खूनप्रकरणी दोघांना उच्च न्यायालयाकडून जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:55 PM2018-01-25T14:55:13+5:302018-01-25T14:57:49+5:30
पिंपरी चिंचवडमधील गोल्डमॅन दत्तात्रय फुगे खून प्रकरणी उच्च न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला आहे़ भिशीच्या पैशावरुन दिघीतील भारतमाता चौकात १५ जुलै २०१६ रोजी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली होती.
पुणे : पिंपरी चिंचवडमधील गोल्डमॅन दत्तात्रय फुगे खून प्रकरणी उच्च न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला आहे़ भिशीच्या पैशावरुन दिघीतील भारतमाता चौकात १५ जुलै २०१६ रोजी रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली होती़
प्रेम ऊर्फ काका ऊर्फ प्रमोद शांताराम ढोलपुरीया आणि शैलेश सूर्यकांत वाळके अशी जामीन मिळालेल्या आरोपींची नावे आहेत़ फुगे यांच्या खुनप्रकरणात अतुल मोहिते, तुषार जाधव, शौकत अत्तार, सुशांत पवार, अमोल ऊर्फ बल्ली पठारे, शैलेश वाळके, विशाल पारखे, निवृत्ती वाळके, प्रमोद ढोलपुरीया या ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दत्ता फुगे यांच्या डोक्यात दगड घालून शस्त्राने वार करुन त्यांचा खून करण्यात आला होता़ यावेळी त्यांचा मुलगा शुभम फुगे आणि त्याचा मित्र रोहन पांचाळ यांनी मोटारीतून जात असताना हा प्रकार पाहिला़ तशी फिर्याद शुभम फुगे यांनी दिली होती़ या फिर्यादीनुसार पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली होती़ न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले़ त्यांच्यापैकी ढोलपुरीया व शैलेश वाळके यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता़ त्यांच्यावतीने अॅड़ अनिकेत निकम आणि अॅड़ शरद भोईटे यांनी युक्तीवाद केला़ अॅड़ निकम यांनी आपल्या युक्तीवादात घटना घडली तेव्हा ढोलपुरीया घटनास्थळी नव्हते़ हे कॉल रेकॉर्ड व मोबाईल टॉवर लोकेशनच्या अभ्यासावरुन दाखविले़ सकृत दर्शनी ढोलपुरीया यांचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचा युक्तीवाद केला़ सरकार पक्षाने युक्तीवादात हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून फुगे यांचा खून करताना फिर्यादीने आरोपीला व इतर आरोपींना सोबत पाहिले आहे़
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून दोघांचा जामीन मंजूर केला़