दोन पोलिसांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 05:28 AM2018-05-19T05:28:51+5:302018-05-19T05:28:51+5:30
येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे : येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस हवालदार नामदेव बाबूराव ढाकणे (वय ३७, रा. आयआरबी औरंगाबाद, हरसुल जेल परिसर, मूळ रा. जालना) आणि पोलीस शिपाई शुक्राचार्य बबन टेकाळे (२७, रा. जालना, मूळ रा. बुलडाणा) अशी त्यांची नावे आहेत.
या प्रकरणात यापूर्वी गिरीश बापूसाहेब अवधूत (३२, रा. पिंपळेनिलख, पुणे) आणि स्वप्निल दिलीप साळुंखे (३२, रा. विश्रामबाग सांगली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय प्रवीण दत्तात्रय भटकर (रा. बावधन), भूषण निरंजनराव देऊलकर आणि तेजस राजेंद्र नेमाडे या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.
>उत्तरपत्रिकेत केले फेरबदल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २ मध्ये एकूण ८३ सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी १२ मार्च ते २१ एप्रिल या कालावधीत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. लेखी परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या ओएमआर (आॅप्टिकल मार्क रिकॉग्नेशन) शीट पुरवणे; तसेच तपासणी करण्याचे काम बावधन येथील प्रवीण भटकर याच्या मे. इटीएच लिमिटेड कंपनीकडे देण्यात आले होते.
भरती प्रक्रिया कालावधीत शारीरिक चाचणी तसेच इतर परीक्षांमध्ये पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा २१ एप्रिल रोजी कवायत मैदानावर घेण्यात आली. त्यात ३ हजार ७३० उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती. त्यानंतर या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम प्रवीण भटकर आणि इतर चार आरोपींकडे देण्यात आले. आरोपींनी ३२ उमेदवारांच्या उत्तरपत्रिकेत फेरबदल केल्याचे समोर आले.