हडपसर : येथील जुना मुळा-मुठा कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि. १७) दुपारी दोनच्या सुमारास मांजरी बुद्रुक घुले वस्ती येथे घडली. घडलेल्या हे घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली होती. प्रेम प्रवीण कुंवर (वय १३) व गणेश विजय राखपसरे (वय ११, दोघेही रा. घुले वस्ती, मांजरी बुद्रुक) असे मृत्यू पावलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत. प्रेम व गणेश दोघे महादेवनगर येथील सानेगुरुजी विद्यालयात शिकत होते. प्रेम कुंवर व गणेश राखपसरे हे दोघे अन्य एका मुलासह घरापासून काही अंतरावर असलेल्या जुना कालव्यात पाण्यात उतरून कडेला खेळत होते. दोघांनाही या घाण पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले. हे पाहून शेजारीच शेळ्या-मेंढ्या चारत असलेल्या एका महिलेने आरडाओरडा केला. तेव्हा या महिलेच्या पतीने दूरवरून पळत येऊन कालव्यात उडी घेऊन काही वेळ या दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तिसऱ्या मुलाने घराकडे धाव घेऊन लोकांना ही माहिती कळविली. तेव्हा स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. साडेचारच्या सुमारास बुडालेल्या ठिकाणापासून काही फूट अंतरावर या दोघा मुलांंना पाण्याबाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांचा हलगर्जीपणामुलांना बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी या मुलांना रुग्णालयात हलविण्यासाठी अॅम्ब्युलन्स बोलावली नाही. नातेवाइकांशी संवाद साधला नाही. त्यामुळे एका मुलाला स्थानिक कार्यकर्त्याने ससून रुग्णालयात आपल्याच वाहनातून नेले, तर दुसऱ्या मुलाला दुचाकीवर खासगी रुग्णालयातून नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित करताच या मुलाला थेट पुन्हा घरी आणण्यात आले. काही वेळ गेल्यानंतर पुन्हा या मुलाला पोस्टमॉर्टमसाठी हलविण्यात आले. पोलिसांनी नातेवाइकांना योग्य मार्गदर्शन न केल्याने घटनेनंतर त्यांची धावपळ झाली.
कालव्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
By admin | Published: April 18, 2016 3:03 AM