पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी राष्ट्रीय महामार्गावरील ६० किमीच्या अंतरावर एकच टोलचा निर्णय घेतला. येत्या एक ते दोन महिन्यांत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवडे (pune solapur national highway varvade toll plaza) व पुणे-नाशिक महामार्गावरील शिंदे टोलनाका (pune nashik highway shinde toll plaza) बंद होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.
पुणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या दोन महामार्गांचा यात समावेश होणार आहे. त्यानुसार पुणे-नाशिक व पुणे-सोलापूर मार्गावरचे दोन टोलनाका बंद होतील. पुणे-सोलापूर मार्गावर ६० किमीच्या आत सावळेश्वर व वरवडे येथे दोन टोलनाका आहे. पैकी सावळेश्वरचा टोलनाका सुरू ठेवण्यात येणार असून वरवडेचा टोलनाका बंद केला जाणार आहे. तर पुणे-नाशिक महामार्गावर शिंदे गावाजवळील टोलनाका आणि संगमनेरचा टोलनाका यात ५२ किलोमीटरचे अंतर आहे. तसेच यापूर्वीच राष्ट्रीय महामार्गने शिंदेचा टोलनाका बंद करावे व तो टोलनाका संगमनेरच्या टोलनाक्यात विलीनीकरण करण्यात यावे, असा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे टोलनाका बंद होणार हे जवळपास निश्चित आहे.
राष्ट्रीय महामार्गावरचे सुटले, पण राज्य मार्गाचे काय?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेला निर्णय केवळ राष्ट्रीय महामार्गालाच लागू आहे. राज्य मार्गांना नाही. त्यामुळे जुन्या पुणे-मुंबई मार्गावर ३१ किमीच्या आत असलेले सोमाटणे फाटा व लोणाजवळचे टोलनाका हे सुरूच राहणार आहेत. त्यामुळे राज्य मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची या निर्णयाने सुटका केलेली नाही. त्यांना टोल देऊनच प्रवास करावा लागणार आहे.
२० हजार वाहनचालकांना दिलासा
वरवडे टोलनाक्यावरून रोज जवळपास वीस हजार वाहने धावतात. यातून रोज जवळपास २० लाख रुपयांचा टोल वसूल केला जाता. आता हा टोलनाका बंद होईल. त्यामुळे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वीस हजार वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.