पुणे : दुचाकी वाहने चोरणाऱ्या जेजुरीतील एकाला समर्थ पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून १ लाख ४० हजारांच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. चोरट्याने पुण्यासह पुणे ग्रामीण आणि नगर जिल्ह्यातून दुचाकींची चोरी केली. तसेच, या चोरलेल्या दुचाकीबाबत कोणाला संशय येऊ नये व पोलिसांनी पकडू नये म्हणून त्याने त्या दुचाकी रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवल्याचे तपासातून उघडकीस आले.दीपक भिवाजी आहेर (वय २९, रा. जेजुरी, ता. पुरंदर मूळ, रा. राहता, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध बसावा, यासाठी समर्थ पोलीस ठाण्याचे पथक ११ मार्च रोजी नाना पेठेतील कादरभाई चौकात संशयित वाहनांची तपासणी करीत होते. या वेळी ए. डी. कॅम्प चौकातून कादरभाई चौकाकडे येणाऱ्या एका दुचाकीस्वार तरुणाने समोर पोलीस वाहनांची तपासणी करीत आहेत, हे पाहिले आणि तो गोंधळला तसेच दुचाकी वळवून तेथून पळून जात असताना पथकातील कर्मचाऱ्याने त्याला ताब्यात घेतले.पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपीकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. तसेच, तो वापरत असलेल्या अॅक्टिवा दुचाकीची कागदपत्रेही त्याच्याकडे आढळून आली नाहीत. त्यामुळे पोलीस त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथे केलेल्या तपासात त्याने सदर मोपेड दुचाकी एका वर्षापूर्वी पदमजी पार्क भागातून चोरीली असल्याचे सांगितले. समर्थ पोलीस ठाण्यात गतवर्षी वाहनचोरीचा गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, कर्मचारी राजस शेख, नीलेश साबळे, गणेश कोळी, सुमीत खुट्टे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
वाहनचोर अडकला पोलिसांच्या जाळ्यात; पुणे ग्रामीण आणि नगर जिल्ह्यात केली चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 8:02 PM
१ लाख ४० हजारांच्या चार चोरीच्या दुचाकी जप्त
ठळक मुद्दे समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल