पुण्यातील कर्वेनगर उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून दोन तरुणांचा मृत्यु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 09:58 AM2021-09-16T09:58:10+5:302021-09-16T10:06:01+5:30
याबाबत पोलीस निरीक्षक जनार्दन होळकर यांनी माहिती दिली. शंकर इंगळे आणि सलील कोकरे हे घराच्या गणपतीची आरती करुन दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन करण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते.
पुणे/ कर्वेनगर : कर्वेनगर येथील उड्डाणपुलाच्या कठड्याला दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात वारजे येथील दोघा तरुणांचा मृत्यु झाला.
शंकर इंगळे (वय २७) आणि सलील ईस्माईल कोकरे (वय २०, दोघे रा. वाराणसी सोसायटी, वारजे माळवाडी) अशी मृत्यु पावलेल्या दोघांची नावे आहेत. हा अपघात कर्वेनगर उड्डाणपुलावर बुधवारी रात्री साडेअकरा वाजता घडला.
याबाबत पोलीस निरीक्षक जनार्दन होळकर यांनी माहिती दिली. शंकर इंगळे आणि सलील कोकरे हे घराच्या गणपतीची आरती करुन दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन करण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. रस्त्यावर गर्दी नसल्याने ते वेगाने कर्वेनगर उड्डाण पुलावरुन जात असताना पुलावरील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यांची दुचाकी पुलाच्या डाव्या बाजूला धडकली. त्यानंतर ती तशीच पुढे गेली. तिने नंतर पुलाच्या उजव्या बाजूच्या कठड्याला धडक दिली. अपघाताच्या आवाजाने जवळच असलेल्या पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी धावत घटनास्थळी पोहचले. परंतु, हा अपघात इतका जोरात झाला की त्यात दोघांच्या चेहर्याचा चेंधामेंदा झाला. पोलीस पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. सलील कोकरे हा शिक्षण घेत होता तर, शंकर इंगळे हा पाण्याचा टँकर पुरविण्याचा व्यवसाय करीत होता. दोघांच्या अकस्मात मृत्युमुळे वारजेत शोककळा पसरली आहे.