पुणे : प्रवासादरम्यान एका प्रवाशाची बॅग रिक्षामध्येच विसरली होती. ही बॅग सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली होती. तसेच काही रोख रक्कमही दिसली. चालकाने या बॅगसह थेट घोरपडी पोलिस चौकी गाठत बॅग त्यांच्याकडे सुपूर्द केली. प्रवाशाने आधीच हडपसर पोलिसांकडे बॅग रिक्षात विसरल्याची तक्रार केली होती. त्यामुळे नियंत्रण कक्षाकडे ही माहिती पोहचली होती. पोलिस चौकीतून याबाबत संपर्क झाल्यानंतर संबंधित प्रवाशांना बॅग परत करण्यात आली.विठ्ठल मापारे (वय ६०, घोरपडी गाव) असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी खुद्दुस मेहबुब शेख हे पत्नी शहेनाज शेख यांच्यासह मापारे यांच्या रिक्षामध्ये केशवनगर भागातून बसले होते. मापारे यांनी दोघांना हडपसरमध्ये सोडले. रिक्षातून उतरताना ते त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरले. मापारे यांच्याही लक्षात ही बाब आली नाही. ते रिक्षा घेऊन बी.टी. कवडे रस्त्यावर आले. तिथे इतर रिक्षाचालकांना ती बॅग दिसली. हडपसरला सोडलेल्या प्रवाशांचीच ही बॅग असावी, याची खात्री पटल्यानंतर मापारे यांनी थेट घोरपडी पोलिस चौकी गाठली. मापारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी लगेच हडपसर पोलिस ठाण्यात संपर्क साधून बॅगबाबत माहिती दिली. काही वेळातच नियंत्रण कक्षातून घोरपडीगाव मार्शलला बॅगची माहिती व प्रवाशांचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांनी प्रवाशांशी संपर्क साधत मुंढवा पोलिस ठाण्यात बोलावले.बॅगमधील साहित्याची खात्री केल्यानंतर शेख यांना बॅग परत करण्यात आली. बॅगमध्ये ११ तोळे सोन्याचे दागिने, २५० ग्रॅम चांदीचे दागिने व २० हजार रुपयांची रक्कम होती. पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव भोसले यांनी मापारे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार केला. पोलिस उपनिरीक्षक विजय कदम, सहायक पोलिस फौजदार निसार शेख यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. मापारे हे पुणे शहर जिल्हा वाहतुक सेवा संघटनेचे सदस्य असून अध्यक्ष संजय कवडे व इतर रिक्षाचालकांनीही त्यांचा सत्कार केला.
'असा' प्रामाणिकपणा दुर्मिळच; रिक्षाचालकाने परत केले प्रवाशाचे तब्बल एवढे तोळे सोने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 12:18 PM