पुणे : मुंबईतील महाविद्यालयांमध्ये गीता वाटण्याएेवजी विद्यापीठाचे निकाल वेळेवर लावावेत असा टाेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांना लगावला. परंतु पावसाळ्यात खड्ड्यांची जबाबदारी सगळ्यांची असल्याचे म्हणत त्यांनी वेळ मारुन नेली.
उद्धव ठाकरे हे अाज (शनिवार) पुणे दाैऱ्यावर असून पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी ते घेत अाहेत. यावेळी पत्रकारांशी बाेलताना ठाकरे यांनी महाविद्यालयात गीता वाटपावरुन विनाेद तावडेंना लक्ष केले. महाविद्यालयांमध्ये गीता वाटण्याएेवजी विद्यापीठाचे निकाल वेळेवर लावावेत अशी टीका त्यांनी केली. तसेच मुंबई विद्यापीठातील गाेंधळ टाळण्यासाठी गीता वाटपाचा कार्यक्रम भाजपाने सुरु केला असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पुण्याविषयी बाेलताना ते म्हणाले, पुण्याकडे दुर्लक्ष झालं हाेतं हे खरं अाहे. परंतु मी अाता पुण्याकडे अधिक लक्ष देणार असून इथल्या पदाधिकाऱ्यांचे कान टाेचले अाहेत. त्यामुळे ते अाता नव्या जाेमाने कामाला लागतील. तसेच अापल्याला पुण्याला वारंवार यायाला अावडेल असेही ठाकरे म्हणाले. नानारला अापला विराेध कायम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. तसेच नाणार आणि समृद्धी प्रकल्प हे दोन वेगळे विषय असल्याचा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.