लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जलरंगातील वैविध्यपूर्ण चित्रे अन् पेन-पेन्सिलच्या साहाय्याने साकारलेल्या विविध चित्रकृती... विविध चित्रकारांनी रेखाटलेल्या व्यक्तिचित्रांपासून ते निसर्गचित्रांपर्यंतची ही अनोखी चित्रमयी दुनिया रसिकांसमोर उलगडली. निमित्त होते, ‘रवी परांजपे फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित चित्र प्रदर्शनाचे.
या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने परांजपे यांच्यावरील चित्रफित प्रदर्शनात सहभागी झालेल्या चित्रकारांना दाखविली. प्रदर्शनातील चित्रे पाहून चित्रकाराला त्याच्या कलेतून मिळणारा आनंद हा अवर्णनीय असतो, अशी भावना रवी परांजपे यांनी व्यक्त केली.
फाउंडेशनतर्फे ऑक्टोबर २०२० मध्ये जलरंग, पेस्टल, पेन-पेन्सिल आणि चारकोल अशा माध्यमात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यात सहभागी झालेल्या चित्रकारांनी साकारलेली विविधांगी चित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत. हा उपक्रम यापुढील काळात चालू राहील, असे सांगत सर्व चित्रकारांना निरनिराळे विषय, माध्यमे, साहित्य वापरून आपल्या कलेस वाट देत राहा, असे आवाहन परांजपे यांनी केले.
हे प्रदर्शन २१ मार्चपर्यंत मॉडेल कॉलनीतील द रवी परांजपे आर्ट गॅलरीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळणार आहेत. रविवारी (दि.२१) प्रदर्शनाच्या समारोपाला दुपारी चार वाजता चित्रकारांसोबत हितगुज व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देणार आहेत. चित्रकला स्पर्धेचे परीक्षण सुनील गोकर्ण, राहुल देशपांडे व दीपा गोरे यांनी केले होते. कोरोना काळात अनेक उत्तम चित्रे हौशी व व्यावसायिक चित्रकारांकडून साकारली होती. त्यांचा उत्साह लक्षात घेऊन सर्व चित्रकारांना प्रोत्साहित करण्यासाठी हे प्रदर्शन भरविले आहे.