कौमार्य परीक्षेविरोधात पुण्यात एल्गार; अंनिसचा पुढाकार, जात पंचायतीला तरुणांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:03 PM2017-12-25T12:03:50+5:302017-12-25T12:09:51+5:30
कंजारभाट समाजामध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी मुलीची कौमार्य परीक्षा घेण्याची अनिष्ट प्रथा आहे. ही अनिष्ट प्रथा बंद व्हावी, यासाठी राज्यभरातील कंजारभाट तरुणांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.
पुणे : कंजारभाट समाजामध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी मुलीची कौमार्य परीक्षा घेण्याची अनिष्ट प्रथा आहे. यामुळे अनेक विवाहित तरुणींना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. ही अनिष्ट प्रथा बंद व्हावी, यासाठी राज्यभरातील कंजारभाट तरुणांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.
विश्रांतवाडी येथे काही दिवसांपूर्वी कंजारभाट समाजातील एका नवरी मुलीची कौमार्य परीक्षा घेण्यास तिच्या नातेवाइकांनी विरोध केला होता. पोलिसांकडेही याविरोधात तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी अंनिसकडे तक्रार करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर रविवारी साधना मीडिया सेंटर येथे अंनिसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत राज्यभरातील कंजारभाट समाजातील तरुण-तरुणींची बैठक झाली. अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, राज्य कार्यकारणी निमंत्रित सदस्य दीपक गिरमे, अॅड. रमेश महाजन, विवेक तमायतीकर, सिद्धांत इंद्रीकर, छाया तमायतीकर, प्रशांत इंद्रीकर, अरुणा इंद्रीकर, कृष्णा इंद्रीकर या वेळी उपस्थित होते.
कंजारभाट समाजामध्ये जात पंचायतीकडून होणारा त्रास, नवरी मुलीचा कौमार्य परीक्षेवरून करण्यात येणारा छळ या विषयावर तरुण-तरुणींनी अनुभव मांडले. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरी मुलीची कौमार्य परीक्षा घेण्याची प्रथा आजही सुरू आहे. यामागे जात पंचायतींचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप या वेळी तरुणांनी केला.
समाजातील मुला-मुलींची लग्न असतील तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन कौमार्य परीक्षा घेऊ देण्यास विरोध करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. जात पंचायतीविरोधात कायदा झाला आहे, त्याच्या मदतीने जात पंचायतीच्या पंचांकडून होणाऱ्या त्रासाविरोधात लढा देण्याचे निश्चित करण्यात आले.