विद्यापीठाने स्वीकारावा ३ प्रश्नपत्रिकांचा पर्याय - डॉ. अरुण अडसूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 02:26 AM2018-05-09T02:26:39+5:302018-05-09T02:26:39+5:30
नाशिक येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा ई-मेल हॅक करून प्रश्नपत्रिका फोडल्याची घटना उजेडात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने एकाऐवजी तीन प्रश्नपत्रिकांचा सेट तयार करावा. पेपर सुरू होण्यापूर्वी काही तास अगोदर त्यापैकी एका प्रश्नपत्रिकेची निवड करावी, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी व्यक्त केले. तंत्रज्ञान प्रगत होत आहे, त्यामुळे वेळ, कागद, परिणामकारकता वाढत असली तरी त्याचे धोके लक्षात घेऊन त्यावर मार्ग शोधला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. अरुण अडसूळ म्हणाले, परीक्षा हा सामूहिक जबाबदारीचा भाग आहे. यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास कोण्या एकाला जबाबदार धरता येणार नाही. परीक्षा आणि निकाल यावर विद्यापीठाची ९० टक्के विश्वासार्हता अवलंबून आहे. त्यामुळे पेपरफुटीसारखे प्रकार घडल्याचे उजेडात आल्यास त्याबाबत कठोर कारवाई केली पाहिजे. परीक्षा योग्य पद्धतीने पार पडाव्यात याकडे विद्यापीठ प्रशासनाने अधिक गांभीर्याने पाहिले पाहिजे.
तंत्रज्ञान प्रगत होत आहे, त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचा वेळ, कागद, कामाची परिणामकारकता वाढत आहे. मात्र या तंत्रज्ञानाचे धोकेही लक्षात घेऊन त्यानुसार योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत.
परीक्षा विभागातील प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यासासाठी तांत्रिक तसेच इतर अनेक उपाययोजना केल्या तरी त्या भेदण्याचा प्रयत्न सातत्याने होणारच आहे. त्यामुळे त्यावर ठोस मार्ग शोधून काढणे आवश्यक आहे.
विद्यापीठाकडून महाविद्यालयांना परीक्षेच्या काही वेळ अगोदर प्रश्नपत्रिका पाठविली जाते. काही त्रुटी राहून ती प्रश्नपत्रिका फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने एकाच विषयाच्या ३ प्रश्नपत्रिकांचा सेट महाविद्यालयांना पाठवावा. या ३ प्रश्नपत्रिकांपैकी कोणती प्रश्नपत्रिका वापरायची याचा मेसेज परीक्षेच्या काही वेळ अगोदर संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पाठवावा. त्याचबरोबर या प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना परीक्षेच्या किती वेळ अगोदर पाठवायची याची वेळ निश्चित करावी. त्यामुळे जरी तिन्ही प्रश्नपत्रिका फुटल्या तरी त्यापैकी नेमकी कुठली प्रश्नपत्रिका वापरली जाणार आहे, हे निश्चित नसल्याने संबंधितांचा प्रयत्न अपयशी ठरू शकेल. परीक्षांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकेल.
विद्यापीठ अनुदान आयोग तसेच नॅकच्या निकषांनुसार मूल्यांकनाला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा पद्धतीची विश्वासार्र्हता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर देण्याची आवश्यकता आहे. महाविद्यालय स्तरांवरून प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार यापूर्वी वारंवार घडले आहेत. त्यामुळे परीक्षा घेण्याची जबाबदारी प्राचार्यांवर निश्चित करणे आवश्यक आहे. परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे, त्याच्या प्रिंटआऊट काढून परीक्षा पार पडेपर्यंत प्राचार्यांनी त्याकडे स्वत: लक्ष दिले पाहिजे. प्रश्नपत्रिका प्राप्त होऊन परीक्षा सुरळीत पार पडली याबाबत त्या त्या दिवशी विद्यापीठाकडे रिपोर्टिंग झाले पाहिजे. त्यामध्ये काही अडचण आली असल्यास त्याबाबतही त्याच दिवशी विद्यापीठ प्रशासनाला माहिती दिली जावी. यामुळे प्रशासनात पारदर्शकता येण्यास मदत होईल. त्याचबरोबर पेपर फुटीचे प्रकार नेमका कुठून घडला याचा शोध घेणे सहज शक्य होऊ शकेल.
महाविद्यालयांनी परीक्षांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी इतर कोणत्याही सबबी सांगता कामा नये. तंत्रज्ञानामुळे विद्यापीठाचा व्याप कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे बदल हे महाविद्यालयांनी स्वीकारले पाहिजेत.
संकेतस्थळ, ई-मेल हॅक करून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या व त्या
सोशल मीडियावरून व्हायरल होण्याचे प्रकार रोखण्यासाठी विद्यापीठाने सायबर, प्रशासन यातील तज्ज्ञ व्यक्तींची एक समिती नेमावी. त्याचबरोबर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला सल्ला देण्यासाठी
एका समितीची स्थापना विद्यापीठाने करावी.