विद्यापीठाकडून आंदोलकांविरोधात पोलिसांकडे फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:17 AM2021-02-23T04:17:31+5:302021-02-23T04:17:31+5:30
मार्ग चुकीचा असल्याने केली कारवाई : व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून ठिय्या आंदोलन पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य ...
मार्ग चुकीचा असल्याने केली कारवाई : व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून ठिय्या आंदोलन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील सभागृहात जबरदस्तीने घुसून आंदोलन करणऱ्या आणि ऐतिहासिक इमारतीमध्ये तोडफोड करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांविरोधात विद्यापीठ प्रशासनातर्फे पोलिसांकडे फिर्याद दिली. विद्यापीठाने परीक्षा न घेतलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे. या मागणीसाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून ठिय्या आंदोलन करत घोषणा दिल्या. मात्र, आंदोलनाचा मार्ग चुकीचा असल्याने ही कारवाई केली जात असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याने विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे विद्यापीठासह राज्यातील सर्व विद्यापीठांनी केवळ अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. तर, इतर विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या पूर्वीच्या परीक्षेतील गुणांच्या आधारे सरासरी गुण देऊन जाहीर केला. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे. या मागणीसाठी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी विद्यापीठात आंदोलन केले.
अभाविपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन परिषदेमध्ये चर्चा केले. तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्थापन केलेल्या समितीद्वारे प्रत्यक्ष खर्चाचा आढावा घेऊन अधिकार मंडळाच्या मान्यतेने शुल्क परताव्याबाबत परिपत्रक काढले जाईल, असा निर्णय घेतला. परंतु, उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णयाच्या अधिन राहून विद्यापीठातर्फे शुल्क परताव्याची अंमलबजावणी केली जाईल, असे लेखी पत्र विद्यापीठाने अभाविपला दिले आहे.
--
अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या ऐतिहासिक इमारतीमध्ये बळजबरीने घुसून इमारतीमधील सभागृहाचे नुकसान केले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनातर्फे संबंधित कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांकडे फिर्याद दिली जाणार आहे. तसेच अभाविपने केलेल्या मागणीनुसार विद्यापीठाकडून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीबाबत अभाविपला लेखी पत्र दिले आहे.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
--
अभाविपच्या मागणीनुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला. परंतु, आंदोलक कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे आंदोलकांविरोधात पोलिसांकडे फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ