पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून ७५ टक्के हजेरी न भरल्याप्रकरणी परीक्षा सुरू असताना, १० विद्यार्थ्यांना पेपर देण्यास मज्जाव केला गेला. वस्तुत: विद्यापीठ परिपत्रक अध्यादेश ६९च्या तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना एक महिन्याची नोटीस न देताही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या या भूमिकेविरुद्ध येत्या २१ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांकडून उपोषण करण्यात येणार आहे.विद्यापीठाच्या मराठी विभागाने नियमबाह्य कारवाई केल्याने विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केली आहे. त्यांनी त्याबाबत विद्यापीठाला खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या अन्यायपूर्ण वागणुकीविरोधात येत्या २१ डिसेंबरपासून उपोषण करणार असल्याचे पत्र मनविसेचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना दिले आहे.कागदपत्रे सादर करुनही कारवाई-प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या समितीने परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास मनाई करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता, परीक्षा सुरू असतानाच पेपर देण्यास मनाई करण्यात आली.४यापैकी काही विद्यार्थ्यांची हजेरी वैद्यकीय कारणास्तव भरली नाही, त्याबाबतची कागदपत्रे विद्यार्थ्यांनी मराठी विभागाकडे सादर केली आहेत, तरीही त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आलेली नाही.
पुणे विद्यापीठ: विद्यार्थ्यांचा उपोषणाचा इशारा, हजेरीचे कारण देऊन परीक्षा देण्यास मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 5:38 AM