पुणे : पुणे विद्यापीठाच्या आवारातील झाडीत दिवसाढवळ््या दारू, गांज्या पार्ट्या होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर विद्यापीठाने तातडीने सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील ३ ते ४ दिवसांत ५० अतिरिक्त सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अशा भागात साध्या वेषातील सुरक्षारक्षक गस्त घालतील, अशी माहिती कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी दिली.विद्यापीठ आवारात ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खडकी गेट जवळील घनदाट झाडीत दिवसाढवळ्या राजरोसपणे दारूच्या पार्ट्या सुरू असल्याचे दिसून आले. गुरुवारी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासन हादरले. सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, गुरुवारपासून आवारातील झाडीत सुरक्षारक्षकांकडून गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. असे प्रकार रोखण्यासाठी विद्यापीठाकडून तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या सेवक वसाहतीलगतच्या सीमाभिंतीला भगदाड पाडण्यात आले असून यातून विद्यापीठात काही व्यक्ती प्रवेश करतात. नाल्यासाठी सोडण्यात आलेल्या सीमाभिंतीच्या खालूनही काही तरुण पार्ट्यांसाठी येतात. ज्या भागात सीमाभिंतीला भगदाड पडले आहे, ते तातडीने बुजविले जाणार आहे. तसेच तातडीने ५० सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जाईल. साध्या वेषातील सुरक्षारक्षकही विद्यापीठ आवारात गस्त घालणार आहेत, असे डॉ. कडू यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विद्यापीठ आवारातील सुरक्षाव्यवस्था वाढविणार
By admin | Published: June 14, 2014 12:15 AM