पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने अध्यापनासाठी यू-ट्यूब चॅनलचा वापर केला जातो आहे. तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या चॅनलला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ११० अभ्यासपूर्ण व्हिडिओ तयार करून अपलोड केले आहेत. या माध्यमातून शिक्षण विभागाचे उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये होणारे उपक्रम, शिक्षणपद्धती या माध्यमातून नागरिकांना समजत आहेत. प्रयोगशील शिक्षकांकडून हिंदी, तसेच मराठी कविता, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यानुभव, अभ्यासविषयक व्हिडिओ यांचा यात समावेश आहे. शिक्षक कोणता विषय कसा शिकवितात, हे पाहून पालकांनाही मुलांचा अभ्यास घेताना त्याचा फायदा होत आहे.
खासगी शाळांपेक्षा महापालिकेच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश देणे पालकांना परवडणारे असते. महापालिकेच्या शाळा खासगी शाळांच्या तोडीचे शिक्षण आणि उपक्रम घेत असून, त्यामुळे महापालिका शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे.
महापालिका शाळांमध्ये होणारे उपक्रम, पालकांचा सहभाग आदी यू-ट्यूब चॅनलवर आहेत. येत्या काळात तीन हजार व्हिडिओ अपलोड करण्याचे ध्येय आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे कलागुण या माध्यमातून सर्वांसमोर येत आहेत.
- संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, महापालिका