यूटीटी स्पर्धा : जगातील २४ आॅलिम्पियन खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 02:31 AM2018-06-13T02:31:20+5:302018-06-13T02:31:20+5:30
या स्पर्धेत जगातील २४ आॅलिम्पिक खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू अर्जुन व छत्रपती पुरस्कार विजेते कमलेश मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे - ‘टेबल टेनिस फेडरेशन आॅफ इंडिया’च्या मान्यतेने (टीटीएफआय) होत असलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत नुकत्याच गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजविलेल्या भारतीय संघातील मनिका बत्रा, मौमा दास, मधुरिका पाटकर, शरथ कमल, अॅँथनी अमलराज, साथियान गणासेकरन, हरमित देसाई, सनिल शेट्टी, पूजा सहस्रबुद्धे आणि सुतीर्था मुखर्जी यांचा खेळ पाहण्याची संधी पुण्यातील टेबल टेनिस खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक आणि क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेत जगातील २४ आॅलिम्पिक खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू अर्जुन व छत्रपती पुरस्कार विजेते कमलेश मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी टेबल टेनिस फेडरेशन आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र टेटे संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस, सरचिटणीस प्रकाश तुळपुळे, क्रीडा समालोचक चारू शर्मा, पराग चितळे, हिरेन मोदी उपस्थित होते.
म्हाळुंगे-बालेवाडी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेबल टेनिस हॉलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण स्पर्धेत सहभागी होणाºया सहा संघांचे कर्णधार अचंता शरथ कमल (वॉरियर्स), गनासेकरन सथियान ( दबंग स्मॅशर्स टीटीसी), लिआम पिचफोर्ड (फाल्कन्स टीटीसी), सिमोन गौझे (एमपावरजी चॅलेंजर्स), हरमित देसाई (आरपी-एसजी मेव्हरिक्स) आणि जाआओ मोंटेरिओ (महाराष्ट्र युनायटेड) यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी मेहता म्हणाले, या स्पर्धेचा फॉरमॅट या वेळी बदललेला आहे. नऊऐवजी सात सामन्यांच्या टायचा फॉरमॅट असणार आहे. नवीन फॉरमॅटमुळे भारतीय खेळाडूंना संधी मिळेल व त्यांना यामधून अनुभवदेखील मिळणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला एक कोटी रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याचबरोबर उपविजेता संघास ७५ लाख आणि उपांत्य फेरीतील प्रत्येकी संघाला २५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
या वेळी राजीव बोडस म्हणाले, की या स्पर्धेमुळे राज्यातील टेबल टेनिस खेळणाºया खेळाडूंच्या संख्येत वाढ झाली आहे. या वर्षी विविध राज्य स्पर्धांमध्ये सुमारे सहाशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यामुळे टेबल टेनिसबाबतची आवड खेळाडूंमध्ये निर्माण झाली आहे. या वेळी प्रकाश तुळपुळे म्हणाले, की भारतीय आणि आंतरराष्टÑीय खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आम्ही राज्यातील जिल्हा संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या, त्यांच्या जिल्ह्यातील खेळाडूंना पुण्यात आणणार आहे.